पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील भंडारज खुर्द येथे एका 36 वर्षीय युवकाचा मारहाण करून खून करून त्याला फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीने दाखवलेल्या समय सुचकतेमुळे हा बनाव उघडकीस आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत प्राप्त सविस्तर माहिती अशी की पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द येथील 36 वर्षीय मिलिंद तुळशीराम इंगळे यांनी बुधवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरी गेलेल्या त्याच्या पत्नीला कळविण्यात आली. पत्नी रिसोड वरून तडकाफडकी परतली.
परंतु तिला संशय आल्याने तिने पातुर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. पत्नी पोहोचण्याच्या आधीच सदर युवकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबातील व गावातील लोकांनी केली. परंतु मिलिंदची पत्नी ऐन अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आले व मिलिंदच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात आले.
आज प्राप्त झालेल्या पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये मिलिंदने आत्महत्या केली नसून त्याला मारहाण करून गळा आवळून खून करण्यात आला व त्याला फासावर लटकवून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला, ही बाब स्पष्ट झाली आहे. याप्रकरणी पातूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. हा खून नेमका कोणी व कशासाठी केला यात आणखी कोण कोण सहभागी आहे, याबाबत पातुर पोलीस पुढचा तपास करीत आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पातूर ठाण्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक (ips) रितू खोकर ह्या पातूर पोलीस ठाण्यात आल्या असून दोन संशयित यांची चौकशी सुरू केली आहे त्याच्या सोबत पातूर ठाणेदार किशोर शेळके हे सुद्धा चौकशी करीत आहेत.