पातूर : तालुक्यांतील आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढुर्णा भाग दोन येथील नियत क्षेत्रात इलेक्ट्रिक करंट द्वारे निलंगाची शिकार करून मृतदेहाची विल्हेवाट लावताना आलेगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीदोन आरोपींना रंगेहात पकडले. दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी आलेगाव वनपरिक्षेत्रामध्ये कर्मचारी वनरक्षक बाळासाहेब थोरात, सतीश साळवे, संदीप अलाट रात्रगस्तीवर असताना दोन अज्ञात इसम इलेक्ट्रिक तार वन क्षेत्रात झाडांला बांधताना आढळले.
सदरील इसमाची अधिक चौकशी केली असता आरोपींनी करंटद्वारे निलगाची शिकार केल्याची कबूल केले. यावेळी जंगलात आजूबाजूला पाहणी केली असता नर जातीची निलगाय मृतावस्थेत आढळून आली. आरोपी नामे राजू लक्ष्मण चौरे, वय 35 वर्ष व गंगाराम मोतीराम कुरुडे, वय 65 वर्ष दोन्ही राहणार अंधारसांगवी यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची वन कोठडी सुनावली.
सदरील कार्यवाही उपवनसंरक्षक अकोला यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव श्विश्वनाथ चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी पातुर धीरज मदने यांनी केली. या कार्यवाहीत वनपाल डी एम इंगळे, अंभोरे व वनरक्षक अविनाश घुगे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी आलेगाव हे करीत आहेत.