Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमुदखेडहून हिमयातनगर कडे आठवडी बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोला अपघात...३ व्यापारी ठार ११ जण...

मुदखेडहून हिमयातनगर कडे आठवडी बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोला अपघात…३ व्यापारी ठार ११ जण जखमी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मुदखेड येथून हिमायतनगर येथे आठवडी बाजारासाठी व्यापाऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून ३ जण ठार झाले आहेत. तर ११ जण जखमी झाले. जखमींना नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहेत. ही घटना आज (दि.२१) सकाळी घडली. या घटनेमुळे मुदखेड शहरावर शोककळा पसरली आहे.

या टेम्पोमधून २० ते २५ जण प्रवास करीत असल्याचे समजते. दरम्यान मुदखेडचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या अपघाताबद्दल प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, मुदखेड-भोकर मार्गावरील राजवाडी तांडा येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, संबंधित यंत्रणेला उपचारांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

या अपघातात महंमद रफीक अमीनसाब (वय ४५), महंमद चांदसाब मिरासाब (वय ६०), महंमद हाफीज महंमद हुसैन (वय ५५) हे मृत्यू पावले आहेत. तर मोहम्मद मेराज (वय १८), मोहम्मद लतीफ (वय ३२), मोहम्मद कुतूस (वय ३२), मोहम्मद अरशर (वय ३२), मोहम्मद इफकीखार (वय २६), महंमद मुनिर अब्दुल्ला (वय २२), अब्दुल जलील रहमान (वय ६०), सय्यद रियाज आसिफ (वय ३०), महंमद रहमद आसिफ (वय २४), महंमद उस्मान (वय ४५) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड शहरातील व्यापारी हे मुदखेड उमरी भोकर हिमायतनगर अर्धापूर बारड नांदेड या बाजारपेठेत कांदे, लसूण विक्री करण्यासाठी टेम्पोने जातात. आज सकाळी मुदखेड होऊन हिमायतनगर येथील आठवडी बाजारात जाण्यासाठी व्यापाऱ्यांना घेऊन हा टेम्पो राजवाडी मार्गे भोकर हिमायतनगरला जाण्यासाठी रवाना झाला.

मुदखेडहून केवळ ५-६ किलोमीटर अंतरावर हा टेम्पो वळणावर आला असता एका बाजूला झुकल्याने उलटला. यावेळी टेम्पोतील काही व्यापारी खाली पडले. तर काहींच्या अंगावर टेम्पोतील थैले भरलेले पडले. यात तिघेजण ठार झाले.

ही घटना बारड पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तुगावे यांनी सांगितले. दरम्यान, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस हवालदार रघुवंशी, पोलीस नाईक बलबिरसिंह ठाकूर, समदानी, रामदास आवळे, विनायक मठपती, नंदकुमार सुरनर, शिनगारपुतळे यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: