BBC documentary : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) च्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रतिबंधित BBC माहितीपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ऐशी घोष यांनी केला. या आरोपांवरून विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा वसंत कुंज पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला.
घोष यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “एबीव्हीपीने दगडफेक केली, परंतु प्रशासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. आम्ही चित्रपटाचे प्रदर्शन जवळपास पूर्ण केले आहे. वीज पूर्ववत करणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही एफआयआर दाखल करू.”
एबीव्हीपीचा जेएनयू विद्यार्थी गौरव कुमारने एएनआयला सांगितले की, “आरोप करणाऱ्या या लोकांकडे आम्ही दगडफेक केल्याचा काही पुरावा आहे का? आम्ही अजिबात दगडफेक केली नाही.” दरम्यान, दिल्ली पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “आम्हाला जेएनयूच्या कोणत्याही विभागाकडून तक्रार आल्यास, योग्य वाटल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केली
विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाचा अवमान करत, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या एका गटाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित करण्याची योजना आखली. या माहितीनंतर जेएनयू प्रशासनाने स्क्रीनिंग थांबवण्यासाठी कॅम्पसमधील वीज खंडित केली. यानंतरही विद्यार्थी गट एका ठिकाणी जमले आणि त्यांनी मोबाईल, लॅपटॉपवर डॉक्युमेंटरी पाहिली.