नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात 10 मे (शुक्रवारी) सकाळी आयकर विभागाचा मोठा फौजफाटा आपल्या असंख्य वाहनासह दाखल झाला होता.आयकर विभागाने खासगी फायनान्स चालवणाऱ्या भंडारी यांच्या कार्यालयावर व घरावर धाड टाकल्या नंतर एकाच वेळी सात ठिकाणी छापेमारी केली असून या छापेमारीत 80 अधिकाऱ्यांनी तब्बल 72 तास कारवाई करून 170 कोटीची रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली असून 14कोटी रोकड व आठ कोटीचे सोने, चांदीचे दागिनेसह कांही महत्वाचे दस्तावेज हस्तगत केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी शहरातील शिवाजीनगर परिसरात एकूण सहा ते सात ठिकाणी छापेमारी केली.खाजगी फायनान्स व जमीन खरेदी विक्रीचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या संजय भंडारी यांच्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थान यावरदेखील छापेमारी करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी 25 वाहनांत साधारण जवळपास 80 अधिकारी आले होते. या पथकात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी इत्यादी शहरातील प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. दोन दिवस झडतीत केवळ कागदपत्रेच हाती लागत होती. आयकर विभागाने शेवटी व्यावसायिकाच्या भावाच्या घरी छापा टाकला. बाहेरून अतिशय जुनाट दिसणाऱ्या घरात मात्र आलिशान फर्निचर, महागड्या वस्तू होत्या येथील लाकडी बेडवरील एका गादीच्या खोळात रोकड लपवलेली आढळली. मिळालेली रोकड मोजण्यासाठी एस. बी. आय.च्या मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांना तब्बल 14तास लागले.आता आयकर विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.