अमरावती : महाराष्ट्र राज्यात प्रथमच तिरंदाजीचे मिनी ऑलिम्पिक अमरावती विभागीय क्रीडा संकुलात सुरू होणार असून, आज मिनी ऑलिम्पिकला क्रीडा ज्योतीचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी क्रीडा ज्योतीच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी क्रीडा ज्योतीच्या रॅलीत सहभाग घेतल्याने सर्व खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत झाला.
राज्याच्या युवक व क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या मिनी ऑलिम्पिकमध्ये 97 तिरंदाजी खेळाडू शहरात दाखल होणार आहेत. सोबतच पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांसह 292 खेळाडू आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान सुरू होणाऱ्या या मिनी ऑलिम्पिकचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विभागीय क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले, एड.प्रशांत देशपांडे, डॉ.प्रमोद चांदूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, कुणाल फुलेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलातून निघालेल्या या मशाल रॅलीचे शहरातील प्रमुख चौकात भव्य स्वागत करण्यात आले.