आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्राम लोतखेड येथील तंटामुक्ती अध्यक्ष व एक माजी सैनिक यांचेतील दोन फूट बोळीचा वडिलोपार्जित दावा गोळीबारात परिवर्तित होऊन तंटामुक्ती अध्यक्षाच्या हत्येचे कारण बनला आहे. या दोन फूट बोळीचा दावेदार असलेल्या माजी सैनिकाने केलेल्या गोळीबारात नमाज पठणापूर्वीच तंटामुक्ती अध्यक्ष ठार झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकोट तालुक्यात लोतखेड हे संमिश्र लोकवस्तीचे गाव आहे. गाव अगदी लहान असल्याने सर्वच लोकांचे एकमेकांशी जवळकीचे संबंध आहेत. ४८ वर्षीय फिरोज खान पठाण हे गत दहा वर्षापासून या गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषवित होते. कुणाच्याही अडचणीत धावून जाण्याच्या स्वभावाने जनमानसात ते चांगलेच प्रिय झालेले होते. त्यांच्या घराशेजारीच इस्माईल शहा यांचे घर आहे. त्यांचे घराच्या मुख्य भिंतीला लागून फिरोज खानचे घर आणि अंगण आहे.
या अंगणात आपली दोन फूट जागा असल्याचे इस्माईलशा यांचे म्हणणे होते. त्याला फिरोज खान चे वडील सुभेदार खान यांचा विरोध होता. हा वाद चिघळत गेला. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप केला. आणि या दोन्ही घरांची सद्यस्थितीच योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्याने दोन्ही पक्षांनी सामोपचाराने वाद मिटविला.
यादरम्यान इस्माईल शहा यांचा मुलगा कदीरशा हा सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन घरी परतला. त्याला हा समझौता मान्य झाला नाही. त्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. त्यामुळे दोन्ही पक्षांचा न्यायालयीन लढा सुरू झाला. परंतु या लढ्याचे परिणाम गावातही दिसू लागले. चार चौघात बसले असता चर्चा कोणतीही असो एका पक्षाचा ऊणा अधिक शब्द दुसऱ्याला आपल्यावरील टॉन्ट वाटू लागला. अशा स्थितीत पवित्र रमजान मास आरंभ झाला.
त्यादरम्यान दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळची अजान झाली. त्यामुळे सुभेदार खाॅं व त्यांचा पुत्र अफरोज खां हे दोघे मशिदीकडे नमाज पठणाकरिता जात होते. जवळच राहत असलेला माजी सैनिक कदिरशहा हा सुद्धा नमाज पठणाकरिता येत होता. हे सारे मशिदीचे जवळ अमोरासमोर आले. हे सारे लोकांसमवेत उभे असताना त्यांची बाचाबाची झाली. प्रकरण ढकलाढकलीवर आले. लोकांनी मध्यस्थी करून वाद थांबविला.
इतक्यात ही खबर फिरोज खान यांना लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. ते तेथे येत असतानाच कदीर शहाही घरातून आला. आणि त्याने फिरोज खानचे निकट येऊन आपल्या हातातील देशी कट्ट्याने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागताच फिरोज खान जागेवरच गतप्राण होऊन खाली कोसळले. त्यांना ताबडतोब उचलून उपचारार्थ नेण्यात आले. दरम्यान ही खबर मिळताच दहीहंडा ठाणेदार सुरेंद्र राऊत घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर जिल्हा अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनीही घटनास्थळ गाठले. एव्हाना पोलिसांनी कदीरशाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याने झाडलेल्या गोळीचे पितळी आवरणाचा शोध घेण्यात आला. मात्र मातकट रंगाचे असल्याने ते आवरण रात्रीचे अंधारात आढळून आले नाही.
दुसऱ्या दिवशी मात्र ते आवरण घटनास्थळी दिसून आले. त्याचा सविस्तर पंचनामा करून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. या दरम्यान गावातील एक सुस्वभावी व लोक मदतीस नेहमी धावून येणाऱ्या माणसाची केवळ दोन फुटाच्या बोळीकरिता अशा रीतीने झालेली हत्या गावकऱ्यांना दुःखात टाकून गेली आहे.