Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीबीडमध्ये आदिवासी महिलेला विवस्त्र फिरविले...भाजपा आमदार पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...

बीडमध्ये आदिवासी महिलेला विवस्त्र फिरविले…भाजपा आमदार पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमदाराच्या पत्नीने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केला असल्याची घटना समोर आली आहे. विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. मात्र सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका महिलेला विवस्त्र करून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. ४० वर्षीय महिला पती आणि सुनेसह शेतात काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी त्यांच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुने समोरच मला विवस्त्र करून विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘घाबरू नका, तिला चांगला चोप द्या‘ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते.

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले, प्राजक्ता धस यांनी सोबत आणलेले वीस ते पंचवीस गुंड त्या ठिकाणी जमले होते. पोलीस आल्यामुळे त्यांना आमच्यावर हल्ला करता आला नाही. हा सर्व प्रकार पोलिसांनी सुद्धा पाहिलेला आहे, त्यांच्यासमोरच हे सर्व घडले असून रघु पवार व राहुल जगदाळे यांनी प्राजक्ता धस यांच्या सांगण्यावरून माझा छळ केला. जातिवाचक शिवीगाळ केली. गेल्या ६५ वर्षांपासून सदर शेतजमीन वडिलोपार्जित आमच्याच ताब्यात असून तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसत आहोत. त्याची नोंद सातबारावर असतानादेखील प्राजक्ता धस यांनी ही जमीन माझी असल्याचा दावा केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.

प्राजक्ता धस यांचा जमीन हडपण्याचा धंदा असून गोरगरिबांच्या जमिनी लोकामार्फत त्या ताब्यात घेतात असेही पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणात प्राजक्ता सुरेश धस यांच्यासह रघु पवार, राहुल जगदाळे या तिघांवर विनयभंगासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम या कलमांसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

यावर आमदार सुरेश धस यांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हणाले, गेल्या २१ वर्षांपासून मी आमदार पदावर आहे. सार्वजनिक जीवनात आम्ही हे करू शकतो का? सदरील घटना घडली , त्यात मी स्वतःच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास सांगितले होते. या प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येणार आहे. कोण चित्रफीत काढत आहे, कोण कोणाला काय सांगत आहे? हे आता समोर येत आहे. मी स्वतः या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली आहे. चौकशीनंतर सर्व सत्यता समोर येईलच असे सांगत सदरील आरोप खोटा असून राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झाल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: