रामटेक प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे यंदाही रामटेक येथे कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्त मंडई उत्सवाचे भव्य आयोजन केले होते .त्रिपुरी पौर्णिमेच्या मध्यरात्री टिपूर जाळुन महिनाभर सुरू असलेल्या पर्वाच्या उत्सवाला श्रद्धाळु श्रद्धेने नमन करतात. त्यानंतर लगेच पहाटेच्या मंद प्रकाशात व गुलाबी थंड हवेच्या झुडूकात या ऐतिहासिक मंडळीला सुरुवात करतात.
लोककलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून कलेचे सादरीकरण करून जनतेचे मनोरंजनातून समाज प्रबोधन करीत असतात व तेवढ्यात उत्सुकतेने चोखंदळ रसिक सुद्धा त्यांना प्रतिसाद देत असतात. अशा प्रकारे तीन दिवसीय महोत्सवाच्या सांस्कृतिक रंगात संपूर्ण रामटेक व आजूबाजूचा परिसर रंगून जात असतो. लोककला ही जनजागृतीची मशाल आहे हिला तेवत ठेवायचे काम लोक कलावंतांनी जीव ओतून करीत आहेत.
याचाच एक भाग म्हणून जय भीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक यांच्याद्वारे खडी गमतीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे दी लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटी रामटेक द्वारे शाहीर उमेद शरनांगत यांनी आपली गंमत सादर केली. तर शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय रामटेक द्वारे शाहीर वसंत दुंडे यांनी आपली कला सादर केली. असे एकूण दहा खडीगंमत दोन दंडार तर एक गोंधळ या मंडळाच्या शाहिरांनी आपली कला सादर करून जनतेचे मनोरंजन केले व समाज प्रबोधनाचे धडे दिले .
त्या प्रित्यर्थ नगरपरिषद रामटेक तर्फे सर्व शाहीर कलावंतांना योग्य ते बक्षीस मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार आशिष जयस्वाल, एस डी ओ वंदना सवरगंपते,मुख्याधिकारी मंगेश वासेकर , प्रशासनाधिकारी राकेश सवालाखे व इतर सर्व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होते. .त्याकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष तथा लोककला अनुदान पॅकेज समितीचे सदस्य शहीर अलंकार टेंभुर्णे यांनी सर्वांचे आभार मानले.