रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येत असलेल्या बोरडा,सराखा,सत्रापुर,खुमारी येथे अचानक आलेल्या वादळाने अनेकांच्या घराचे छत उडाल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाले तर झाडे उखडून विद्युत तारेवर पडल्याने गावातील सर्व नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली.
2 मिनिटांच्या या रुद्ररूपी वादळाने असंख्य कुटुंबियांना रडण्यास भाग पाडल्याचे चित्र यावेळी दिसून आले. 30 मार्चला सायंकाळी 7.30 वाजता पासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती.अचानक 8.30 वाजताच्या सुमारास पाऊस येत असतांनाच वादळाने रुद्ररूपी अवतार घेत अनेकांचे नुकसान केले.
सराखा,बोरडा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टिनाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले तर कुणाच्या घरावरील शेड उडून कुठे गेला याचा शोध अजूनही लागलेला नाही. असाच हाल शेतकऱ्यांचा देखील बघावयास मिळाला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संपूर्ण कापूस शेतामध्ये टिनाचा शेड असलेल्या गोठ्यात ठेवले होते मात्र अचानक आलेल्या या वादळाने गोठ्यावरील टिनाचा शेड उडून गेले व पावसामुळे संपूर्ण कापूस ओला झाला.
गावातील मोठमोठे झाडे या रुद्ररूपी वादळाने तुटून विद्युत तारेवर पडल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत तार तुटून रस्त्यावर पडल्याचे तर शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाली होती.
गावातील सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कान्द्री- सोनेघाट सर्कलचे जि.प.सदस्य संजय झाडे यांनी नुकसानग्रस्तांना भेट दिली.व विद्युत विभाग,तहसीलदार, मंडळ अधिकारी,पटवारी व कोतवाल यांना नुकसान झाल्याची माहिती दिली व तात्काळ घटनास्थळी येऊन नागरिकांची समस्या दूर करण्याची प्रशासनाला सूचना दिली.
तर नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आर्थिक सहाय्य करण्याचे कबूल केले.व प्रशासन नक्कीच नुकसानभरपाई देईल अशी हमी दिली. ही संपूर्ण घटना अतिशय दुःखद असून अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले असून अनेक जण बेघर झाले आहे.तर नूकसानग्रस्तांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची विनंती दुःखी ग्रामवासीयांनी केली आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम सायंकाळच्या सुमारास घडल्याने मोठी जीवितहानी टळली.जर दुपारच्या सुमारास अशी घटना घडली असती तर निश्चितच खूप मोठी जीवित हानी झाली असती अशी माहिती गावकऱ्यांनी प्रतिनिधीसमोर बोलतांना दिली.