Sunday, December 22, 2024
Homeराजकीय४० वर्षांचा कालखंड…१० लढती…९ स्पर्धक…आले आणि गेले…पण हा भिडू मात्र मैदानात भक्कमच…

४० वर्षांचा कालखंड…१० लढती…९ स्पर्धक…आले आणि गेले…पण हा भिडू मात्र मैदानात भक्कमच…

आकोट – संजय आठवले

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात तब्बल ४० वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या १० लढतींमध्ये ९ प्रतिद्वंद्व्यांशी दोन दोन हात करूनही चक्क अकराव्यांदा शड्डू ठोकून ताज्या दमाच्या दोन स्पर्धकांना पुन्हा आव्हान देणाऱ्या योद्ध्याचा युद्ध अविष्कार लोकसभा निवडणुकीचे निमित्याने अकोला युद्धभूमीवर ह्यावेळी बघावयास मिळणार आहे.

हा योद्धा कधी हरला, कधी जिंकला, कधी त्याने कुणाला नमविले तर कधी कुणाच्या विजयाचे तो निमित्य ठरला. त्यातील सर्वच जीत पराजित स्पर्धक मैदानातून केव्हाच बाद झाले आहेत. परंतु हा भिडू मात्र चक्क अकराव्यांदा ताज्या दमाच्या दोन स्पर्धकांना मात देण्याच्या ईर्षेने न दमता मैदानात भक्कम उभा ठाकला आहे. होय हा भिडू ॲड. प्रकाश आंबेडकरच आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात अकोला लोकसभा मतदारसंघावर सातत्याने काँग्रेसचाच वरचष्मा राहिलेला होता. मात्र सन १९८४ च्या निवडणुकीपासून अकोल्यातील काँग्रेसच्या प्रभावाला उतरती कळा लागली. ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आव्हान देण्याकरिता भाजपकडून प्रथमच भाऊसाहेब फुंडकर हा कुणबी चेहरा देण्यात आला.

तर भारिप कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीच्या माध्यमाने अकोल्यातून राजकारणात प्रवेश केला. कसलेले आणि मुरब्बी काँग्रेस नेते स्व. नानासाहेब वैराळे यांचे समोर हे दोन्ही भिडू अगदीच नवखे आणि अननुभवी होते. पण या दोघांनीही मारलेली मुसंडी मात्र जबर आणि अकोल्याच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी देणारी ठरली.

ह्या निवडणुकीत स्व. नानासाहेबांना १,७८,८७४ मते पडली. तर प्रकाश आंबेडकर यांना १,६५,०६४ आणि पांडुरंग फुंडकर यांना १,४८,९०९ मते पडली. असे म्हणतात कि, आंबेडकरांची ही प्रथम धडक विजयाचाच साक्षीदार ठरणारी होती. पण वेळेवर मोठी घडामोड होऊन जातीय समीकरणे प्रभावी ठरल्याने स्व. नानासाहेबांचा अवघ्या १३,८१० मतांनी निसटता विजय झाला.

बाळासाहेब आंबेडकर द्वितीय तर भाऊसाहेब फुंडकर तृतीय स्थानी स्थिरावले. परंतु हा पारंपारिक राजकीय जय पराभवाचा निर्णय नव्हता. तर अकोला जिल्ह्यातील राजकारणात निरपेक्ष, कट्टर हिंदू, आणि दलित मतांची फाळणी करणारा तो सामाजिक आणि धार्मिक अघोर होता.

त्याने काँग्रेस च्या पारंपारिक दलित मतांची विभागणी झाली. आणि त्यानंतरच्या १९८९ ते १९९८ या काळात भाजपचा वारू चौखूर उधळला. त्या ९ वर्षांच्या काळात ३ लढती झाल्या. त्यामध्ये सातत्याने भाऊसाहेब फुंडकर अग्रणी राहिले. तर ॲड. प्रकाश आंबेडकर, अजहर हुसेन, सुधाकरराव गणगणे आणि डॉ. संतोष कोरपे यांनी त्यांना झुंज दिली.

परंतु दलित मतांच्या विभाजनामुळे भाजप अनावर होत झाला होता. ही बाब काँग्रेस आणि आंबेडकर यांना कळून चुकली. परिणामी १९९८-९९ च्या मुदतपूर्व तर १९९९-२००४ या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ॲड. आंबेडकर आणि काँग्रेसची दिलजमाई झाली. आणि दोन्ही निवडणुकीत ॲड. आंबेडकर हे विजयी ठरले.

परंतु २००४-०९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ॲड. आंबेडकर यांच्या मधुचंद्राला पुन्हा ग्रहण लागले. परिणामी काँग्रेस आणि आंबेडकर यांनी मिळून लावलेला लगाम सैल होऊन भाजपचा वारू पुन्हा चौखूर उधळला. तो सातत्याने २०२४ च्या आताच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम आहे.

आता पुन्हा ही निवडणूक होत आहे. सातत्याने गत ४० वर्षांपासून या निवडणुकीत ठाम उभे राहणारे ॲड. आंबेडकर यांनी ह्या निवडणुकीतही ११व्यांदा दंड थोपटले आहेत. वास्तविक प्रत्येक निवडणुकीत दंड थोपटणे ही परंपराच आहे. परंतु यंदा ॲड. आंबेडकरांच्या ह्या दंड थोपटण्याला एक प्रदीर्घ इतिहासाची वैशिष्ट्यपूर्ण आणि रंजक अशी झालर आहे.

ती अशी कि, बाळासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब फुंडकर या दोघांचीही अकोला लोकसभा उमेदवार म्हणून अकोल्यात १९८४ साली सोबतच परंतु प्रथमच एन्ट्री झाली. त्यावेळी ॲड. आंबेडकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तर भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपाचे प्रतिनिधित्व केले. दोघेही पराभूत झाले. परंतु दोघांच्याही निमित्याने अकोला जिल्ह्यात मत विभाजनाचा प्रयोग कायमस्वरूपी रूढ झाला.

त्या स्थितीत ॲड. आंबेडकर यांचा फुंडकरांशी ५ वेळा सामना झाला. त्यात आंबेडकर तीनदा पराभूत तर दोन वेळा विजयी झाले. सलग दोन विजयानंतर काँग्रेसशी नाळ तुटल्याने ॲड. आंबेडकर यांना संजय धोत्रे यांचे कडून सलग ४ वेळा मात खावी लागली. परंतु विजयी होवो अथवा पराभव मिळो ॲड. आंबेडकर सन १९८४ पासून आता २०२४ पर्यंत सतत ४० वर्षे मैदानात कायम आहेत.

ह्या ४० वर्षात ॲड. आंबेडकर हे तब्बल १० लढती लढले आहेत. या लढतींमध्ये त्यांनी ९ मातब्बर नेत्यांशी दोन दोन हात केले आहेत. त्यामध्ये स्वर. नानासाहेब वैराळे, डॉक्टर संतोष कोरपे, बाबासाहेब धाबेकर आणि संजय धोत्रे हे चार मराठा, भाऊसाहेब फुंडकर हे एकमेव कुणबी, प्रा. अजहर हुसैन, हिदायक पटेल हे दोन मुस्लिम तर सुधाकरराव गणगणे, लक्ष्मणराव तायडे हे दोघे माळी यांचा समावेश आहे.

या लढतीत ॲड. आंबेडकर दोनदा प्रथम क्रमांकावर आणि चार वेळा दुसऱ्या तर चार वेळा तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांच्या या १० लढतीतील सुरुवातीच्या दोन निवडणुका आणि विजयी ठरलेल्या दोन निवडणुका सोडल्या तर उर्वरित पाच निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आंबेडकरांची गोळाबेरीज भाजपला तोंडच वर काढू देत नाही.

सरळ अर्थाने पाहिले तर सन १९९८-९९ मध्ये झालेली काँग्रेस आंबेडकर युती जर सन १९८९ मध्येच झाली असती तर अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप कधीच यशस्वी झाला नसता. म्हणजे आज मितीपर्यंत काँग्रेस आंबेडकर युतीचेच येथे प्राबल्य राहिले असते. सामान्य मतदारांनाही ही स्थिती अतिशय मनपसंत होती.

आजही आहे. परंतु दरवेळी नवनवीन प्रयोग करण्याची आंबेडकरांची हौस आणि त्या हौसेखातर आंबेडकर यांना कमी लेखण्याची काँग्रेसची वृत्ती आणि त्या सोबतीला उभय पक्षांचा अहंकार हा सामान्य मतदार, ॲड. आंबेडकर आणि काँग्रेस ह्या तिघांनाही नडला.

अशा स्थितीत ॲड. आंबेडकरांनी पुन्हा निवडणूक रिंगणात भक्कम पाय रोवले आहेत. येथे उल्लेखनीय आहे कि, गेल्या ४० वर्षातील १० लढतींमध्ये त्यांचेशी लढलेले ९ ही योद्धे मैदानातून केव्हाच बाद झालेले आहेत. नानासाहेब वैराळे, भाऊसाहेब फुंडकर, बाबासाहेब धाबेकर हे दिवंगत झाले आहेत.

तर सुधाकरराव गणगणे, अजहर हुसैन, लक्ष्मणराव तायडे, संजय धोत्रे, हिदायत पटेल, संतोष कोरपे हे प्रभूती प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्राम करीत आहेत. परंतु ॲड. आंबेडकर मात्र सतत ४० वर्षांच्या अथक संघर्षानंतर अद्यापही ताज्या दमाच्या नव्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत निवडणूक मैदानात शड्डू ठोकीत भक्कमपणे उभे आहेत. राजकारणात येणाऱ्या सर्व नवशिक्या आणि अननुभवी नवयुवकांनी सतत संघर्ष, जिद्द आणि परिश्रमाचा हा आदर्श वारसा ॲड. आंबेडकरांकडून घ्यायलाच हवा.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: