आकोट पोलिसात तक्रार… आरोपी पोलीस फरार…
आकोट – संजय आठवले
अकोला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिसाने आपल्या पोलीस मित्राच्या ३८ वर्षीय पत्नीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तिला ब्लॅकमेल केल्याने पीडीतेद्वारे देण्यात आलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलिसाचे विरोधात आकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने अकोला जिल्हा पोलीस दल हादरले असून रक्षकाच्या आवरणाखाली भक्षकाची भूमिका पार पाडीत आपल्या पोलीस मित्राला दगा देणाऱ्या ह्या आरोपी पोलिसाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान पीडितेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयास केल्याने तिच्यावर अकोला येथील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त असून आरोपी पोलीस मात्र फरार झाला आहे.
घटनेची हकीकत अशी कि, सद्यस्थितीत अकोला स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शुभम दुबे याची गतवर्षी रामदास पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्री झाली. मित्र या नात्याने त्याचे आपल्या मित्राचे घरी येणे जाणे सुरू झाले. त्यानिमित्ताने शुभमची आपल्या मित्राच्या पत्नीशी ओळख झाली.
त्याचवेळी शुभमची बुभूक्षित नजर तिच्यावर पडली. तिचा हव्यास बाळगून त्याने तिचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला. आणि तिला फेसबुकवर मैत्री संदेश पाठविला. तीनेही त्याच्या संदेशाला दुजोरा दिला आणि फेसबुक द्वारे दोघांचा सुसंवाद सुरू झाला.
अल्पकाळातच या संवादाचे रूपांतर प्रेमालापात झाले. वास्तविक पीडित महिला ही दोन लेकरांची माता आहे. तर शुभमही दोन अपत्यांचा पीता आहे. परंतु प्रेमात अन युद्धात सारे क्षम्य आहे या म्हणीनुसार दोघांमध्ये उगवलेला प्रेमांकुर शरीर संबंधांपर्यंत वाढला. त्यानंतर या दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले.
या दोघांच्या ह्या प्रेमाचा शुभारंभ १ जानेवारी २०२२ या नववर्ष दिनाच्या शुभ मुहूर्तावर झाला. तो सतत सुमारे दोन वर्षे म्हणजे १८.१२.२०२३ पर्यंत कायम राहिला. यादरम्यान पिडीतेच्या पतीला या संबंधाची पुसटशीही जाणीव झाली नाही.
त्याच्या ह्या अनभिज्ञतेचा गैरफायदा घेऊन शुभमने पिडितेशी बरेचदा शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे मनोबल फारच उंचावले. त्यामुळे त्याने तीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. पिडितेने काही काळ ते गुपचूप सहन केले. मात्र डोक्याचे वर पाणी गेल्याने हा सारा प्रकार तिने आपले पतीला सांगितला. हे ऐकताच पती एकदम हादरला.
नंतर संयत होऊन त्याने कायद्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला. आणि पिडितेला घेऊन आकोट पोलीस स्टेशन गाठले. तिथे पिडितेने तक्रार नोंदविली. त्यावरून शुभम वर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पिडित महीला आणि तिचा पती आपल्या आकोट येथील निवासस्थानी गेले.
परंतु झालेल्या घटना प्रकाराने आपली सामाजिक बेअब्रू झाल्याच्या जाणिवेने पीडिता कमालीची कासावीस झाली. त्यामुळे तिने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयास केला. ती बाब लक्षात येताच पिडितेला अकोला येथील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या दरम्यान आकोट पोलिसांनी शुभमचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो आपले कर्तव्याचे ठिकाणी तथा निवासस्थानीही आढळून आला नाही. त्यामुळे तो फरार झाल्याचे समजून आकोट पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. या प्रकरणाचा तपास आकोट पोलीस ठाण्यात कार्यरत सहा. पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे ह्या करीत आहेत.
दरम्यान शुभमची कौटुंबिक माहिती घेतली असता, तो विवाहित असून दोन अपत्यांचा पिता असल्याचे कळले. त्याचे आजोबा आणि वडीलही पोलीस विभागातच कार्यरत होते. सचोटी आणि दक्षतेने त्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली असून समाजात एक संस्कारी परिवार म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु शुभमच्या ह्या गैरकृत्याने त्यांना अपार वेदना झाल्या आहेत. तर दुसरीकडे मोबाईलच्या दुरुपयोगाने दोन सुखी कुटुंब उध्वस्त झाल्याचा आणखी एक किस्सा जग जाहीर झाला आहे.