Saturday, November 16, 2024
Homeगुन्हेगारीपोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यास अटक... हत्येचा गुन्हा दाखल...२५ एप्रिल पर्यंत कोठडी...आणखी दोघांचा...

पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यास अटक… हत्येचा गुन्हा दाखल…२५ एप्रिल पर्यंत कोठडी…आणखी दोघांचा शोध सुरू…

आकोट – संजय आठवले

गुन्ह्याच्या तपासात पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयीतास संबंधित पोलिसांनी जबर मारहाण केल्याने झालेल्या त्याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक तथा त्याचा सहकारी पोलीस कर्मचारी यांना सीआयडी पथकाने अटक केल्यानंतर आकोट न्यायालयाने आरोपींना २५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात सामील असलेल्या आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे.आकोट पोलीस ठाण्यात सुखदेव महादेव हरमकार यांनी केलेल्या तक्रारीनुसार घटनेची हकीकत अशी कि, फिर्यादी हा आकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे मोलमजुरी करून राहतो. त्याचा पुतण्या गोवर्धन हा आकोट येथे मजुरी करीत होता. त्याला दि.१५.१.२०२४ रोजी आकोट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांनी कशाचे तरी संशयावरून अटक करून ठाण्यात नेले.

त्यानंतर दि.१६.१.२०२४ रोजी जवरे व तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी गोवर्धनला सुकळी येथे आणले. तिथे पोलिसांनी त्याचे घराची झडती घेतली. परंतु तिथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यावर सुखदेव यांनी पोलिसांना झाल्या प्रकाराची विचारणा केली असता त्यांना गावातील लोकांसमक्ष मारहाण करून पोलिसांनी ठाण्यात आणले.सदर चुलता पुतण्या ह्यांना ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी जबर मारहाण केली. त्यात सुखदेव यांचे डोके फुटले.

त्यावर पोलीस उपनिरीक्षक जवरे यांनी एका ऑटो वाल्याला पाचशे रुपये देऊन सुखदेवला खाजगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु पोलिसांच्या धाकाने सुखदेव ने श्री शिवाजी महाराज चौकातच ऑटोतून उतरून पळ काढला. सुखदेवला रुग्णालयात पाठवीत असताना जवरे व पोलीस गोवर्धनला मारहाण करीत होते. यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. त्यावेळी मारहाणीत गोवर्धनच्या फासळ्या तुटल्या होत्या. अमानुषतेचा नृशंस प्रकार म्हणजे पोलिसांनी गोवर्धनच्या गुप्तांगात दांडा घातला.

ह्या जिवघेण्या यातनांनी हडकुळा गोवर्धन ‘काका मला वाचवा’ असा प्राणांतिकता टाहो फोडीत होता. पण लाचार सुखदेव पाणावल्या डोळ्यांनी हा अघोरी प्रकार पाहण्याखेरिज त्याची काहीही मदत करू शकला नव्हता. पोलिसांनाही पाझर फुटत नव्हता. असह्य वेदनांनी तळमळणाऱ्या गोवर्धनला पोलिसांनी शहरातील डॉ. नागमते यांचे रुग्णालयात नेले. त्याची अत्यवस्थ स्थिती पाहून त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

तिथेही त्याचा उपचार शक्य न झाल्याने त्याला अकोला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु दि.१७.१.२०२४ रोजी पोलिसांनी त्याला अकोला येथील विघ्नहर्ता या खाजगी इस्पितळात दाखल केले. तेथे डॉ. नितीन जायभाये यांनी गोवर्धनचा उपचार केला. परंतु जिव्हारी मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या साऱ्या धावपळीत दिलीप पवार रा. देशमुख प्लॉट आकोट हा गोवर्धनचा मित्र त्याचेसोबत होता.

दि. १८.१.२०२४ रोजी हा दिलीप पवार व त्याचे चार नातेवाईक सकाळी सात आठ वाजता चे सुमारास सुखदेव यांचे घरी आले. गोवर्धन चा मृत्यू झाल्याची खबर त्यांनी सुखदेव ला दिली. त्यावर गोवर्धनची आई सौ. लीला गणेश हरमकार, काका सुखदेव हरमकार आणि दिलीप पवार हे खाजगी वाहनाने अकोल्यास जाण्यास निघाले.

रस्त्यात सूर्या धाब्याजवळ आकाश चावरे हा या लोकांच्या वाहनामागे आला. अकोला येथील विघ्नहर्ता इस्पितळाजवळ आल्यावर आकाशने सुखदेवला ‘मी सांगतो तसे कर नाहीतर पोलीस तुला मारून टाकतील’ असे सांगितले. त्यानंतर तेथील कागदपत्रांवर सुखदेवचे अंगठे घेऊन दुपारी दीड वाजता चे सुमारास गोवर्धनचे प्रेत सुखदेवचे हवाले केले गेले.त्यानंतर ते प्रेत शवविच्छेदनाकरिता अकोला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

हा सोपस्कार पार पाडल्यानंतर प्रेताचे दहन करणेकरिता सुखदेव सुकळी येथे जाण्याचे तयारीत असताना आकाशने स्वतः गाडी सांगून त्याद्वारे गोवर्धनचे प्रेत अकोला येथील मोहता मिल मोक्षधाम येथे आणले. यावेळी ग्राम सुकळी येथील गंगाधर गावंडे हे सोबत होते. त्यांचे उपस्थितीत गोवर्धनचे प्रेत या ठिकाणी जाळण्यात आले. ह्याकरिता येणारा सारा खर्च आकाश चावरे ह्यानेच केला.या घटनेनंतर आठ दिवसांनी सुखदेव ने ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट येथे येऊन गोवर्धनच्या शवविच्छेदन अहवालाची मागणी केली.

त्यावर ‘साहेब आल्यावर अहवाल देतो’ असे उत्तर तेथील पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे यांनी दिले. परंतु अहवाल दिला नाही. म्हणून पुन्हा चार दिवसांनी सुखदेव आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेले. तेव्हा तेथील ठाणेदार जुनगरे यांनी सुखदेवला ४.३.२०२४ रोजी येण्यास सांगितले. त्यानुसार सुखदेव हे योगेश सुरेश सावरकर यांना घेऊन ठाण्यात गेले. परंतु ठाणेदार जुनगरे यांनी अद्याप अहवाल आला नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले.

म्हणून सुखदेव यांनी दि. ७.३.२०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांचे कडे फिर्याद दिली. परंतु त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. उलट दि. ८.३.२०२४ रोजी गोलू राठोड व त्याचा मित्र हे सुकळी येथे सुखदेव यांचे घरी आले. आणि शवविच्छेदन अहवाल मागणेबाबत त्यांनी सुखदेवला धमकाविले.

त्यावर घाबरलेल्या सुखदेव ने रात्री १० वाजे नंतर घरी येणे व पहाटेच ३, ३.३० वा. घरून निघून जाणे सुरू केले.अशातच एका मानवतेच्या पुजाऱ्याशी सुखदेवची भेट झाली. त्याचे दिलाशांनी स्थिर होऊन सुखदेव ने विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तडकाफडकी घटनेची दखल घेऊन याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण थेट विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांचे समक्ष गेले. त्यांनीही ह्या प्रकरणी दखल घेतली.

परिणामी पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि चंद्रप्रकाश सोळंके या दोघांना निलंबित करण्यात आले.प्रकरणाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी करून सीआयडी पोलीस उपअधीक्षक दिप्ती ब्राह्मणे यांचे पथकाने पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे व चंद्र प्रकाश सोळंके यांना ताब्यात घेतले. त्यांचेवर भादवी ३०२,३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी विनायक रेडकर यांचे आकोट न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने त्यांना २५ एप्रिल पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेत आणखी दोन पोलिसांचा सहभाग असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.आकोट पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक देवकर याने लाच स्वीकारून पोबारा केल्याची घटना ताजीच असताना, आता ह्या हत्या प्रकरणाची जबर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने आकोटातील समाजमन अतिशय क्षुब्ध झाले असून आता पोलिसांवर विश्वास कसा ठेवावा? असा संत प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: