आकोट – संजय आठवले
आकोट बाजार समितीमधून अशासकीय प्रशासकांच्या उचल बांगडीनंतर रुजू झालेल्या शासकीय प्रशासकाची कारकीर्द औट घटकेची ठरली असून त्या जागी पुन्हा नव्या शासकीय प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आकोट येथिल सहा. उपनिबंधक पदाचा प्रभारही त्यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. परंतु बाजार समितीची निकट भविष्यातील निवडणूक ध्यानात घेऊन या दोन्ही नियुक्त्या हेतू पुरस्सरपणे केल्याची संबंधितांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे या नव्या प्रशासकाची कारकीर्द सुरू होण्याआधीच त्यांचे बाबत शंका कुशंका उपस्थित होत आहेत.
संचालक मंडळाच्या बरखास्तीनंतर आकोट बाजार समितीमध्ये रुजू झालेल्या अशासकीय प्रशासकांचा कारभार बराच वादग्रस्त ठरलेला आहे. बाजार समितीच्या हिताकरिता काही ठोस करण्याऐवजी या प्रशासकांचा अर्धा अधिक कार्यकाळ जुने-पुराणे सूड उगविण्यातच गेला. त्यात कुणाला उध्वस्त तर कुणाला स्थापित करण्याचेच कारनामे केले गेले. सुरुवातीला या प्रशासकांनी संगनमताने ही सूड उगवण केली. परंतु कालांतराने अनेक बाबतीत एकमेकांचे हितसंबंध आड येत गेले.
त्याने एकसंध असलेल्या प्रशासकात विभाजन होऊन ते ईतस्तत: विखुरले गेले. त्यातूनच अंतर्गत यादवीला सुरुवात झाली. परंतु काही प्रशासकांनी “मौनम् सर्वार्थम् साधनम्” भूमिका घेऊन तटस्थता स्वीकारली. अशा स्थितीत या प्रशासकांचा व्यापाऱ्यांशी दोनदा टकरावही झाला. परिणामी प्रशासकांची काहीही हानी न होता, बाजार समितीला मात्र नुकसान सहन करावे लागले.
या गदारोळात शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण बाबी राहूनच गेल्या. बाजार समितीमध्ये मोकाट डुकरे व भुरट्या चोरांचा राबता आहे. त्याकरिता बाजार समितीची आवार भिंत बांधणे सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. त्यासोबतच व्यापारी व शेतकरी यांचा माल ठेवण्याकरिता नवे सुरक्षित शेड उभारणे, बाजार समितीतील रस्ते बांधणे, शेतकऱ्यांचा माल पसरविण्याकरिता काँक्रीट करणे, शेतकरी, व्यापारी, हमाल यांचे करिता विश्रामगृह उभारणे, बाजारात येणाऱ्या गुरांकरिता शेड उभारणे, गुरांना वाहनात चढ-उतार करण्याकरिता तजवीज करणे, गुरे,
शेतकरी यांच्याकरिता शुद्ध व स्वच्छ पेयजलाची व्यवस्था करणे, सुविधा युक्त उपहारगृह उभारणे, बाजार समितीमध्ये कामे केलेल्या कंपन्यांची देणी चुकती करणे, वसूल पात्र रकमा वसूल करणे याबाबत या प्रशासकांनी साधा प्रस्तावही तयार करण्याची तसदी घेतली नाही. व्यापाऱ्यांशी झालेले वादंगही या प्रशासकांना मिटविता आले नाहीत. बाहेरून आणलेला कुणी नेता अथवा अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने या वादंगांवर तोडगे काढले गेले. ह्या साऱ्या घटनाक्रमांमुळे प्रशासकांचा कारभार बजबजपुरीचा आणि बाजार समितीच्या डोक्याचा ताप ठरला.
अशा स्थितीत न्यायालयाने शासकीय प्रशासकांच्या उचल बांगडीचा आणि रिक्त स्थानी शासकीय प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश पारित केला. त्याने या अशासकीय प्रशासकांना डच्चू मिळाला. त्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून आकोटचे प्रभारी सहा. उपनिबंधक खाडे यांची वर्णी लागली. परंतु आपण अद्यापही कार्यरतच आहोत हे दर्शविण्याकरिता माजी मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांचा बाजार समितीमध्ये वावर कायम राहिला.
त्यांच्या या राबत्याने आणि बाजार समितीमध्ये उगाच आपला समय व्यतीत करण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या ह्या वर्तनाची चांगलीच कुजबूज होऊ लागली. वास्तविक एकदा पायउतार झाल्यावर पुंडकर यांचे बाजार समितीमध्ये वारंवार येणे हे संशयास्पदच होते. त्यातच प्रशासक खाडे यांच्याशी त्यांचा घट्ट सलोखा असल्याने या संशयाला अनेक पंख फुटले.अशातच कुठेतरी काहीतरी हालचाली झाल्या आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आकोट येथे प्रभारी सहा. उपनिबंधक म्हणून रोहिणी विटणकर दाखल झाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी बाजार समिती प्रशासकाचाही प्रभार घेतला.
वास्तविक त्या सहा. उपनिबंधक दर्जाच्या नाहीत. बार्शीटाकळी येथे सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात त्या ग्रेड वन दर्जाच्या कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी सहा. उपनिबंधक नसल्याने त्यांचेकडेच तो प्रभारही दिलेला आहे. सोबतच बार्शीटाकळी बाजार समितीवर त्या प्रशासकही आहेत. महत्त्वाचे म्हणजे बार्शीटाकळी बाजार समितीचा व्याप आकोट सारखा नाही. त्यामुळे विटणकर यांना मोठ्या बाजार समिती कार्याचा अनुभव नाही.
म्हणून त्यांना पातुर, बाळापूर अथवा तेल्हारा येथील प्रभार देणे संयुक्तिक ठरले असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आकोट बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर तेथे शासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले गेले होते. त्यामध्ये एक प्रथम वर्ग अधिकारी, एक ऑडिटर तथा एक सहा. उपनिबंधक असा तिघांचा समावेश होता. परंतु आता ग्रेड वन दर्जाचा कर्मचारी प्रशासक म्हणून एकटाच नियुक्त केला गेला आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि एका सत्ताधारी मंत्र्याच्या नावाचा उपयोग करून विटणकर यांची नियुक्ती हेतूपुरस्सर करवून घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
रोहिणी विटणकर यांच्या या नियुक्तीमागे निवडणुकीसोबतच काही अन्य कारणेही दडली असल्याचे बोलले जात आहे. पहिले कारण म्हणजे, बाजार समितीमधील तीन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी अशासकीय प्रशासक मंडळाने एका वकील महोदयांना सोपविली होती. त्याकरिता त्यांना दीड लक्ष रुपये मेहनताना अदा करण्यात आला. परंतु न्यायालयाने ह्या चौकशीकरिता वकिलाचा अहवाल स्वीकारार्ह नसल्याचे सांगून हा अहवाल फेटाळला. त्यामुळे या चौकशीकरिता प्रशासक मंडळाने केलेली ही वकिलाची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले.
परिणामी या वकील महोदयांना अदा केलेले दीड लक्ष रुपये प्रशासक मंडळाकडून वसुलीस पात्र ठरले. विशेष म्हणजे हे वकील महोदय अन्य कुणी नसून नवनियुक्त प्रशासक रोहिणी विटणकर यांचे वडील आहेत. त्यामुळे या वसुलीकरिता त्या अशासकीय माजी प्रशासकांना दिलासा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या रकमेच्या वसुली संदर्भात संजय गावंडे, डॉ. गजानन महल्ले, डाॅ. प्रमोद चोरे, प्रदीप वानखडे, ऍड. मनोज खंडारे यांनी दिनांक २२.८.२२ रोजी जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांचेकडे तक्रार केलेली आहे.
दुसरे कारण म्हणजे बाजार समितीचे विवादित सचिव राजकुमार माळवे यांनी शेतकरी हिताची दूरदृष्टी ठेवून “घंटो का काम मिंटो मे” करण्याकरिता बाजार समितीमध्ये दहा टन भार वहनाचा तोल काटा बसविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झालेली आहे. नागपूर येथील ईगल कंपनीने हा काटा कोणतीही देव घेव न करता मोठ्या भरवशावर दिला. आकोट शहरातील जितू शर्मा या कंत्राटदाराने हा काटा बसवून दिला. परंतु त्या पोटी या लोकांना माजी मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी एक पै ही अदा केली नाही.
या लोकांनी वारंवार मागणी केली असता दरवेळी पुंडकरांनी कोणते ना कोणते कारण दाखवून हे ९ लक्ष ९३ हजाराचे देयक लटकवून ठेवलेले आहे. आता ईगल कंपनी अथवा कंत्राटदार न्यायालयात गेल्यास त्यांना आलेला खर्च व व्याजासह ही रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे तसे होण्यापूर्वी ही रक्कम अदा करणे गरजेचे आहे. परंतु त्यामध्ये पुंडकरांना काहीतरी तडजोड करावयाची असल्याची कुजबूज आहे.
तिसरे कारण म्हणजे बाजार समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचे पाच-सात लक्ष्यांचे देणे बाकि आहे. त्याचाही निपटारा करावयाचा आहे. अशाप्रकारे वसुलीत दिलासा, देयकात तडजोड व निपटारा करावयाचा असल्यानेच रोहिणी विटणकर यांची आकोट बाजार समिती प्रशासक पदी हेतूपुरस्सरपणे नियुक्ती करवून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु या बोलांमध्ये किती तथ्य आहे, हे कळण्याकरिता रोहिणी विटणकर यांच्या कारकिर्दीचे काही दिवस जाऊ द्यावे लागणार आहेत. मात्र बाजार समिती निवडणूक अगदी उंबरठ्यावर असल्याने त्यांची कारकीर्दही अल्पकालीनच ठरणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये काय काय घडते याकडे लक्ष लागलेले आहे.