आकोट – संजय आठवले
पोलीस स्टेशन दहीहंडाचे हद्दीत जउळखेड खुर्द येथे काळवीटाची शिकार करून त्याचे मांस विकणारास दहीहंडा पोलिसांनी अटक केली असून त्याला वनविभागाचे हवाली करण्यात आले आहे. वनविभागाने आरोपीस आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस तीन दिवसांची वन कोठडी सुनावली असून या प्रकरणातील दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस स्टेशन दहीहंडाचे उपनिरीक्षक अरुण मुंडे हे नियमित गस्तीवर असताना गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून त्यांनी जउळखेड खुर्द येथे शोध घेतला असता त्यांना काळवीटाची शिकार करून मास विकताना ईश्वर बाळकृष्ण इंदोरे हा आढळून आला. त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून प्रादेशिक वनविभाग आकोट वर्तुळ कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीस ताब्यात घेतल्यावर आकोट वर्तुळ क्षेत्र सहायक एस. पी. राऊत, वनरक्षक ए. झेड. हुसेन, पी. ए. तुरुक, सोपान रेळे, राहुल बावणे, दीपक मेसरे तथा अकोला फिरते पथक वनरक्षक इंगळे, स्वप्निल राऊत, चालक अनिल चौधरी या पथकाने प्रकरणाची चौकशी सुरू केली.
त्यावेळी आरोपीकडून काळवीटाचे मांस, त्याचे मुंडके, एक सुरा, एक विळा, एक लाकडी ठोकळा, एक मोबाईल फोन असे साहित्य जप्त केले. त्यानंतर आरोपी बाळकृष्ण इंदोरे ह्यास रीतसर अटक करण्यात येऊन त्याला आकोट न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी आकोट न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. चौकशी वेळी आपल्या गैरकृत्यात आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याची आरोपीने कबुली दिली.
त्यांचा शोध घेतला असता गणेश दयाराम इंदोरे रा. जवूळखेड खुर्द आणि संतोष सोळंके रा. जवूळखेड बुजुर्ग हे दोन्ही आरोपी फरार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन्ही फरार आरोपींचा शोध चौकशी पथक घेत आहे.