आकोट- संजय आठवले
आकोट तालुक्यातील आदिवासी गाव चिचपाणी येथील शेतकरी रामजी गवते हे रात्री आपल्या शेतात राखणी करीत होते. शेतातच त्यांची गुरे बांधलेली होती. त्यांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी ३ ते ४ वर्षीय नर बिबट रात्री बारा वाजताचे सुमारास गुरांकडे आला. तेथे असणाऱ्या कुत्र्यांना त्याची चाहूल लागली. त्यांनी एकच कोलाहल करून बिबट्याचा पाठलाग केला. त्याने घाबरलेला बिबट पळून जात असताना गवते यांच्या शेतातील विहिरीत पडला.
कुत्र्यांच्या गोंगाटाने जाग आलेल्या रामजी गवते यांचे ध्यानात ही बाब येताच त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बिबट विहीरित पडल्याची वार्ता सांगितली. गावकऱ्यांनी ही खबर वनविभागाचे कर्मचाऱ्यांना दिली. त्यावर पहाटे ५ वाजताच वनरक्षक सी.एम. तायडे, ए. पी. श्रीनाथ, धुमाळे मॅडम, चिंचोळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीला असलेल्या नखांच्या ओरखड्यांनी विहिरीत हिंस्त्र श्वापद पडल्याचे वन कर्मचाऱ्यांचे ध्यानात आले.
त्यांनी गळाच्या सहाय्याने विहिरीत तपासणी केली. गळ कशात तरी अडकल्याने विहिरीत काहीतरी पडल्याचे जाणवले. परंतु त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे विहिरीतील श्वापद बेशुद्ध किंवा मृत झाले असावे असा अंदाज बांधला गेला त्यानंतर त्याच गावातील दोन ईसम विहिरीत उतरले तेव्हा त्यांना बिबट्या मृत्यू झालेला आढळला. विहिरीत ३० ते ३५ फूट खोल पाणी असल्याने आणि कुत्र्यांच्या पाठलागाने भेदरलेल्या बिबट्या मृत झाला होता. त्या अवस्थेत त्याला बाहेर काढण्यात आले.