धीरज घोलप
शिवसेनेतील एका नेत्याने आपली बायको आत्महत्या करेल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपद मागून घेतल्याचा धक्कादायक खुलासा सत्ताधारी शिवसेनेचे (शिंदे) मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाश्याने सत्ताधारी शिंदे गटात मोठी खळबळ माजली आहे. तसेच यावरून सत्तेसाठी सुरू असलेली साठमारीही उघड झाली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत असल्याचे आरोप सातत्याने विरोधकांकडून होत असतात. त्याची पुष्टी आता भरत गोगावले यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झालेत, असे भरत गोगावले म्हणालेत. या माध्यमातून त्यांनी आपल्या पक्षात मंत्रिपदासाठी सुरू असलेली साठमारी उघड करून एकप्रकारे स्वतःची मंत्रिपदाची सुप्त इच्छाही बोलून दाखवली आहे. ते अलिबागमधील एका पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी भरत गोगावले यांनी आपले मंत्रिपद कसे हुकले याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले -शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या गटातील काही आमदारांनी एकनाथ शिंदेंवर दबाव टाकून मंत्रिपद घेतली.
आम्हाला आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडल्याचे दिसले. आम्ही बोललो ठिक आहे, पुढे काय? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन.
त्याची बायको तर जगली पाहिजे!
गोगावले पुढे म्हणाले, आता बायकोवाल्याचे करायचे काय? मग साहेबांना (एकनाथ शिंदे) बोललो त्याच्या बायकोला जगवायला पाहिजे म्हणून साहेबांना बोललो त्याला देऊन टाका. आणि त्याला नारायण राणेंनी संपवू नये म्हणून त्यालाही देऊन टाका. आपली एकही जागा कमी होता कामा नये. म्हणालो मी थांबतो तुमच्यासाठी. तेव्हापासून मी थांबलो तर थांबलोच आहे.
संभाजीनगरचा तो आमदार कोण?
एकाने 5.30 ला फोन केला. बोललो काय रे, संभाजीनगरला तुम्हाला 5 पैकी दोघांना दिले. आम्ही तीनपैकी एक पण घेत नाही. आम्ही थांबतो. मी बोललो तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावले.
ते आमदार शिरसाट तर नव्हेत?
छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट सुरुवातीपासूनच मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपली इच्छा अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे गोगावलेंनी उल्लेख केलेला संभाजीनगरचा एक आमदार संजय शिरसाट आहेत की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे या 2 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, गोगावले यांच्या या विधानामुळे शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.