रामटेक – राजु कापसे
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील चोरबाहुली वनपरीक्षेत्र सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. ख्रिसमस नाताळपासून येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून वाघांचे दररोज दर्शन होत असल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.
चोरबाहुली गेट, जो पेंच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे, येथे T-108 नावाचा नर वाघ आणि T-45 नावाची वाघीण दररोज दिसून येत आहेत. त्यांच्या नियमित दर्शनामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. T-108 आणि T-45 ही जोडी सध्या पर्यटकांच्या कॅमेऱ्याचे आकर्षण बनली आहे
ख्रिसमस सुट्टीच्या निमित्ताने चोरबाहुली गेटवर आलेल्या पर्यटकांनी वाघांचे नियमित दर्शन घेतल्याने इथली प्रसिद्धी झपाट्याने वाढली आहे. वनविभागाने याठिकाणी योग्य व्यवस्थापन ठेवत सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावले उचलली आहे. पर्यटकांना सुरक्षित व उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.
पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देत त्यांची मेहनत अधिक प्रभावी ठरतेय. चोरबाहुली गेटला भेट देताना पर्यटकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जंगलातील शांतता व प्राणीजीवनाचा आदर ठेवणे अत्यावश्यक असून वन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प देशभरातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. येथे आढळणारे वाघ, तसेच जैवविविधतेने नटलेले जंगल पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य भाग आहे. चोरबाहुली गेट येथील वाघांचे नियमित दर्शन ही या प्रकल्पाची विशेषता ठरत आहे.
वन्यजीवप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे, कारण निसर्गाच्या कुशीत वाघांसोबतचा अनुभव हा आयुष्यातील अविस्मरणीय ठरतो. चोरबाहुली गेटच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक व्यवसाय व पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली आहे.