जळगांव (जामोद) – अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 24 व 25 नोव्हेंबर 22 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगांव जामोद येथे ठिय्या आंदोलन करून शेतकरी, शेतमजूर, वनजमीन अतिक्रमण धारक आदिवासी शेतकरी, ह्यांच्या विविध समस्या घेऊन आंदोलन केले होते.
त्यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांनी तहसीलदार ह्यांना सर्व जवाबदार विभागांना बोलावून बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.परंतु,जवळपास एक महिना होत असताना काहीच हालचाल किसान सभेला दिसून न आल्याने पाठपुरावा म्हणून किसान सभेने 22 डिसेंबर 22 ला पाण्याच्या टाक्या ताब्यात घेऊन त्यावर आमरण उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला दिला होता.
त्यामुळे प्रशासन जागृत होऊन जळगांव (जामोद) तहसीलदार ह्यांनी पंचायत समिती, वनविभाग, वीज वितरण कंपनी, पुरवठा विभाग व महसूल विभागाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेला आमंत्रित करीत संयुक्त बैठक बोलाविली त्यावेळी पुढील 2 दिवसात प्रशासन कोणत्या प्रकारे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर काम करेल ह्याची वाट किसान सभा बघेल अन्यथा पुढील उपोषण सुरू करून प्रशासनाला शेतकरी लोकांच्या समस्या सुटेपर्यंत लढा सुरू ठेवेल असे कॉम्रेड विजय पोहनकर ह्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.