नागालँडमध्ये मंगळवारी संध्याकाळी एक दुर्घटना घडली. येथे मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळली होती. त्यामुळे टेकडीवरून मोठमोठे दगड पडू लागले आणि रस्त्याने धावणाऱ्या तीन गाड्या त्याच्या कचाट्यात आल्या. यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे दिमापूर आणि कोहिमा दरम्यान चुमौकेदिमा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 29 वर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोहिमा बाजूने येणाऱ्या दोन गाड्यावर डोंगरावरील दगड पडल्याने एका कारचा चक्काचूर झाला आणि दुसऱ्या कारलाही धडक दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एका व्यक्तीचा संदर्भ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दगडांच्या कचाट्यात आलेल्या तीन कारचा चुराडा झाला.
पोलिसांनी सांगितले की, एक व्यक्ती अजूनही कारमध्ये अडकला असून त्याला वाचवण्याचे काम सुरू आहे. अपघातादरम्यान कार कोहिमा कडून येत होत्या. त्यांच्या मागे धावणाऱ्या एका वाहनाच्या कॅमेऱ्यात ही दुःखद घटना कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.