सांगली – ज्योती मोरे
17 जानेवारी 2023 रोजी शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निगडी गावच्या शिवारात सदाशिव दादू साळुंखे व हिराबाई सदाशिव साळुंखे या वयोवृद्ध दांपत्याच्या घरावर दरवाजा तोडून दरोडा टाकण्यात आला होता.यावेळी दरोडेखोरांनी हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेत असताना त्यांनी विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण केली होती .त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.या घटनेचा कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि शिराळा पोलिसांनी तपास करून यामधील मगऱ्या अशोक उर्फ अजित बाबा काळे वय 19, राहणार येवलेवाडी, तक्षद उर्फ स्वप्नील पप्प्या काळे वय 20,राहणार कार्वे व गोपी ऊर्फ टावटाव त्रिशूल उर्फ तिरशा काळे वय 19 राहणार ऐतवडे या वाळवा तालुक्यातील तिघा आरोपींना लक्ष्मी फाटा इस्लामपूर रोडवरून सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान यामध्ये आणखी दोघा आरोपींचा समावेश असून सध्या ते फरारी असल्याने त्यांचा तपास पोलीस करत आहेत.या आरोपींची अंगझडती घेतली असता,त्यांच्याजवळ 3 लाखांचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,10,600 रुपये रोख आणि 60 हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 3,70,600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा निगडीतील दरोडा, कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोडीसह इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोडीतील असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.
सदर आरोपींपैकी मगऱ्या अशोक काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कासेगाव,आष्टा, इस्लामपूर आदी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सांगितले.पुढील तपास शिराळा पोलीस ठाणे करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,सुनील चौधरी, उदयसिंह माळी,बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे,संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, संतोष गळवे, विक्रम खोत जितेंद्र जाधव शुभांगी मुळीक ,कॅप्टन गुंडवाडे प्रकाश पाटील अंकुश ढवळे, अमोल कोतकर ,सत्यजित पाटील, अजय बेंद्रे, सुधीर गोरे आदींनी केली.