सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
सांगली येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद केल्याबद्दल सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आ. गाडगीळ यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन सांगलीकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले . माजी आमदार अमल महाडिक हेही यावेळी उपस्थित होते.
नाट्यपंढरी अशी ओळख असलेल्या सांगलीतील अत्याधुनिक व सुसज्ज असे नवे नाट्यगृह सुरु व्हावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. नव्या नाट्यगृहासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे आराखडा सादर केला होता. आ. गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन नाट्यगृहासाठी राज्य शासनाने निधी द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाकडे आ. गाडगीळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ९ मार्च रोजी सादर झालेल्या २०२३- २४ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी राज्य सरकारने २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगलीकरांची मागणी त्वरेने मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले , असे आ. गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.