मुंबई – भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.
भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे विधान परिषदेतील गटनेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाच्या सत्तापिपासू राजकारणावर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात.
भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता? नरेंद्र मोदी व भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिणलेला आहे.
कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते व त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपाचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे.
समृद्धी महामार्गावर बस अपघातात २६ लोक होरपळून मेले त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपाच्या लोकांना जराही लाज वाटली नाही. भाजपा सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.
भाजपाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात विविध आंदोलने करणार आहे तसेच पत्रकार परिषदा घेऊन भाजपाचा खरा चेहरा उघडा करणार आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसबद्दल भाजपा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहे.
राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु असतानाही अशाच बातम्या पेरल्या होत्या, आताही अफवा पसरवल्या जात आहेत पण काँग्रेस पक्षातून कोणीही जाणार नाही. सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीतून बिभीषण प्रवृत्ती गेली ते बरेच झाले असे स्पष्ट करुन नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्षाबरोबर जे पक्ष येणार त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. विधानसभेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे आणखी चांगले काम करु. पण राज्यात जे राजकारण सुरु आहे ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपाच्या या राजकारणाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.