रामटेक – राजु कापसे
रामटेक – नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती पारशिवनी हद्दीतील ग्रामपंचायत घाटरोहना अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मध्ये शासनातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार असलेल्या पॉकेटमध्ये मृत चिमणी आढळून आल्याने शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंत्राट परवाना रद्द करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
माहितीनुसार, ग्राम पंचायत घाटरोहना पंचायत समिती पारशिवणी अंतर्गत अंगणवाडी क्रमांक ३१ येथे कुमार निल नेहाल शिंदेकर या मुलाला पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविके द्वारा पॉकेट बंद आहार देण्यात आला, पालकांनी घरी आहारातील एक पॉकेट उघडले असता त्यात मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्याने पालकांची पायाखालची जमीन सरकली गेली.
अंगणवाडी येथे मोठया प्रमाणात निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याच्या तक्रारी संबधित विभागाकडे करून देखील तक्रारी विरोधात कुठलीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण भागातील ० ते ३ वयोगटातील मुल आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. असा निकृष्ट आणि मृत अवशेष रहित पोषक आहार खाऊन मुलांचे पोषण होईल का ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना शासनाद्वारे थाटात राबवली जाते.मात्र आहाराचा दर्जा बघायला प्रशासना कडे वेळ नाही ही शोकांतिका आहे,ग्रामीण भागातील गोर,गरीब मध्यमवर्गीय बालकांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळावा हा त्यांच्या अधिकार आहे,अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार पुरवठाधारका सोबत प्रशासनाकडून देखील होत आहे. अस बोलल्या जात आहे.
या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी.संबंधित पुरवठादाराचे परवाना रद्द करून काळ्या यादीत टाकावे, पुरवठाधारकाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आणि जिल्हयात पुरवठा केलेले आहार माघारी घ्यावा अशी मागणी सरपंच व सदस्य यांनी केली आहे. संबधीत पुरवठा धारकावीरोधात अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.