Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनबालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम...

बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम…

मुंबई – गणेश तळेकर

बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत व चित्र, शिल्प अशा ललित कला संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत.

बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्यरत आहे. बालकला केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक स्वरुपापर्यंत मर्यादित न राहता, ही लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमी परिषदेचा मानस आहे.

याचाच एक भाग म्हणून विशेष, दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक मंच उपलब्ध करू देताना, त्यांच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या हेतूने महाराष्ट्रभर दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव “यहां के हम सिकंदर” हा विशेष मुलांचा कला महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे असे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महोत्सवात विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या अनूदानीत व विनाअनूदानीत संस्था / शाळा यात सहभागी होणार आहेत. वय वर्षे १८ खालील मुले या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघास सादरीकरणासाठी १० मिनीटे वेळ दिला जाणार आहे. ज्यात ( नाटीका, नकला, गाणे , नृत्य, रांगोळी, चित्र, योगा, वाद्य वाजवणे यातील काहीही ) कला सादर करता येणार आहे.

या महोत्सवात अधिकाधिक संस्थांनी, शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या वतीने करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे यासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

हा विशेष मुलांचा कला महोत्सव ५ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यान राज्यभर आयोजित करण्यात आला असून विशेष, दिव्यांग मुलांचा महोत्सव “यहां के हम सिकंदर” या उपक्रमात विविध जिल्ह्यांमधून चार हजारहून अधिक दिव्यांग कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग प्रेक्षक मुलांना हा महोत्सव पाहता येणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व संस्था व शाळांना पाच हजार रुपये मानदेय देण्यात येणार आहे.

तसेच सर्व दिव्यांग कलाकार, शिक्षक व दिव्यांग प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक सहभागी संघास व शिक्षकास स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले जाणार आहे.

महोत्सवाच्या ठिकाणी दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रर्दशन ठेवण्यात आले असून या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सक्षम मुलांच्या प्रमाणे दिव्यांग मुलांच्या मनोरंजनाचा हक्क त्यांना मिळावा म्हणून हा संकल्प बालरंगभूमीने केल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के- सामंत यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष ॲड .शैलेश गोजमगुंडे, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दीपाली शेळके समिती प्रमुख धनंजय जोशी , नागसेन पेंढारकर व इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: