गडचिरोली – मिलिंद खोंड
कामानिमित्त आलापल्ली येथे आलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी मिळून अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. रोशन गोडसेलवार (२३ रा. आलापल्ली) आणि निहाल कुंभारे (२३) अशी आरोपींची नावे आहेत.
एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत दहावीला शिकत होती. कामानिमित्त शनिवारी आलापल्ली ला आली होती. एका ओळखीतल्या मुलाने तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेऊन दोन्ही आरोपींनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला व आलापल्ली येथील चौकात सोडून दिले.
मुलीने झालेल्या प्रकाराची हकीकत चौ कात लोकांना सांगितली मात्र, कुणीही तिला प्रतिसाद दिला नाही. काहींनी तर तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला.
त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. एटापल्ली पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून घेत प्रकरण अहेरी पोलिसांकडे वर्ग केले.
अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे.