संजय आठवले, आकोट
आकोट तालूक्यातील ग्राम जऊळखेड येथिल सरपंच पती आशिष निपाणे ह्यास लाच प्रतिबंधक अधिका-यानी ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर आरोपीस आकोट जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांचे समक्ष हजर केले असता त्याला ४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. ती मुदत संपल्यानंतर आरोपीस पुन्हा न्यायालयात हजर केले असता लाच प्रतिबंधक अधिकारी व सरकारी वकिल यांचे विनंतीवरुन न्यायालयाने आशिष निपाणे ह्यास १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विद्यमान अति. जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांचे समोर दहिहांडा पोलीस स्टेशनकडून गुन्हा क. ३०२/२२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७. ७-अ मधील आरोपी इसम आशिष दत्तात्रय निपाणे, वय वर्ष ३५ रा. जळखेड, ता. आकोट, जि. अकोला याने शासकीय कंत्राटदार शरद झांबरे रा. अकोला याच्याकडून रु.४०,०००/- ची लाचेची रक्कम स्विकारल्याबद्दलचे प्रकरण ठेवण्यात आले.
या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला की, अकोला येथील शासकीय कंत्राटदार शरद झांबरे यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे लेखी तक्रार दिली की, २०२१-२२ मध्ये मौजे जऊळखेड, ता. आकोट जि. अकोला. येथील जि.प. शाळेचे रू.५,००,०००/- दुरूस्ती व रस्त्याचे काम केले होते. सदर कामाचे देयक जि.एस.टी. व इतर शुल्क वगळून एकूण रु. ४,६६,१३२/- जि.प. अकोला येथून मंजूर होउन ग्रामपंचायत जवळखेडच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
या देयकाचे आर. टी.जी.एस. फार्म वर ग्रामसेवक उत्तम तेलगोटे आणि सरपंच ग्रामपंचायत जऊळखेड श्रीमती निपाणे यांची सही आणून देण्याच्या मोबदल्यात या प्रकरणातील आरोपी आशिष निषाणे याने व दुसरा आरोपी ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी कंत्राटदार झांबरे याना ४६ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर तडजोडी अंती रू. ४०,०००/- घेण्याचे बोलणी बाबत निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे अकोला आकोट रोडवरील करोडी फाट्याजवळील एस्सार पेट्रोल पंप येथे आरोपी आशिष निपाणे याला रू. ४०,०००/- लाचेची रक्कम स्विकारल्याने रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर या आरोपीचे नैसर्गिक आवाजाचे नमुने घेण्याकरिता तसेच या प्रकरणातील फरार आरोपी लोकसेवक उत्तम तेलगोटे या ग्रामसेवकाचा शोध घेउन याला अटक करण्याकरिता आरोपीस पोलीस कोठडी देण्यात यावी. या युक्तीवादानंतर आकोट न्यायालयाने आशिष निपाणे ह्यास दि. ०४.०८.२०१२ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ही मुदत संपल्यावर आरोपी आशिष निपाणे ह्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. ह्यावेळी आरोपीस न्यायालय कोठडी द्यावी असा अर्ज तपास अधिकारी यानी न्यायालयास सादर केला. त्यावर न्यायालयीन कोठडीऐवजी आपणास जामीनावर सोडण्यात यावे असा अर्ज आरोपीतर्फे करण्यात आला. त्यानुसार जामीन देण्यासाठी न्यायालयाने सरकारी वकिल यांचे म्हणणे काय? अशी पृच्छा केली. त्यावेळी सरकारी वकिल अजित देशमूख यानी विद्यमान न्यायालयास सांगितले कि, या प्रकरणी तपास अधिकारी यांचे लेखी म्हणणे मिळाल्याखेरिज ह्या प्रकरणी माझे म्हणणे न्यायोचित होणार नाही. त्यामूळे आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. यावर न्यायालयाने तपास अधिकारी व सरकारी वकिल अजित देशमूख यांचे विनंतीनुसार आरोपीचा अर्ज फेटाळून त्याला १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.