आकोट शहरातील शैक्षणिक क्षेत्रात लौकीकास पात्र ठरलेल्या आकोट शिक्षण संस्थेच्या वतीने श्री सरस्वती शैक्षणिक संकुलात श्री शिवाजी विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुश्री मीना धुळे व नगर परिषदेच्या शाळा क्र.३ चे मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲड्. मोहनराव आसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुश्री मीना धुळे यांनी शिक्षक ते मुख्याध्यापक या कार्यकालांत श्री शिवाजी विद्यालय, आकोट येथे विद्यार्थोपयोगी उपक्रम राबवून आदर्श प्रशासनाचे उदाहरण प्रस्तुत केले. आकोट नगर परिषद शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांनी भटक्या व विमुक्त फासेपारधी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणले व त्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, पाटी, वह्या, दप्तर व पूर्ण गणवेश मोफत दिले. त्यांना स्वच्छ राहण्याचे ज्ञान दिले.
समाजासमोर आपल्या शैक्षणिक मुल्यांद्वारे उदाहरण घालुन दिले. त्या निमित्त सत्कारमूर्ती द्वयांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. “नोकरी करून समाजाचे हीत जोपासणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा यथोचित गौरव करणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती देणे होय. तसेच ईतरांना त्यातुन प्रेरणा मिळावी”, ह्या हेतुने हा कार्यक्रम असल्याचे ॲड. मोहनराव आसरकर यांनी सोदाहरण आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सांगितले. संचालन शिक्षिका रश्मी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला संकुलाच्या सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.