नांदेड – महेंद्र गायकवाड
महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने महानगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांचे गेल्या चार वर्षांपासूनच्या अनेक प्रकारच्या मागण्या प्रलंबित आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने घरभाडे भत्ता आणि बोनस हा विषय प्रलंबित होता. डॉ.सुनील लहाने यांनी कंत्राटी सफाई कामगारांना घरभाडे भत्ता अधिनियम 1983 नुसार पाच टक्के कामगाराच्या वेतनात सामील करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्याबद्दल महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीने मा.डॉ.सुनील लहाने यांचे जाहीरपणे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देत आहेत.परंतु सफाई कर्मचाऱ्यांच्या गेल्या चार वर्षापासून बोनसचा विषय आहे तसेच प्रलंबित आहे. सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी नांदेड महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना बोनस अधिनियम 1965 नुसार देणे बंधनकारक असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना बोनस अनुदान देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून हेतू पुरस्कार टाळाटाळ केल्या जात आहे.
स्वच्छता कामगार कोविड सारख्या महामारी मध्ये आपल्या जीवाची परवा न करता तुटकुंजा अल्प वेतनावर कोविडमध्ये काम करून नांदेड नगरीतल्या नागरिकांची आरोग्य व स्वच्छताची विशेष काळजी घेऊन आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडले आहे.स्वच्छता कामगारांना कोविड मध्ये काम केल्याचा विशेष भत्ता सुद्धा दिला नाही अशा परिस्थितीमध्ये स्वच्छता कामगार हे आपल्या मागणीवर ठाम असून दिवाळी बोनस घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे कॉम्रेड गणेश शिंगे यांनी जाहीर केले आहे.
21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता महानगरपालिका कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन कामगारांच्या तीव्र भावना महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणार आहेत.
21 तारखेच्या पूर्वी दिलेल्या निवेदनानुसार कामगाराच्या बोनस मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 पासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक व अध्यक्ष काँ. शिंगे यांनी दिली आहे.