न्यूज डेस्क – पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना काल सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. ED च्या तपासात संजय राऊत यांच्या घऱी साडे अकरा लाखांची रक्कम सापडली होती. ज्यामधील १० लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनीही या पैश्याबाबत माहिती दिली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव असून शिवसेनेकडून चौकशीची मागणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं. यावर ते म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे”. संजय राऊतांची चौकशी सुरु असून जे काही सत्य असेल ते समोर येईल असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर रविवारी (३१ जुलै) सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.