नांदेड – महेंद्र गायकवाड
काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेत शिवसेनेने सहभागी व्हावे त्यासोबतच आपणही या यात्रेस उपस्थिती लावावी अशी विनंती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली असता त्यांनी निमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यात आपण सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील हजारो शिवसैनिक यात्रेत सहभागी होतील असे आश्वासन देतानांच आपण किंवा आदित्य ठाकरे यापैकी एकजण भारत जोडो यात्रेत नक्कीच सहभागी होऊ असे आश्वासन देत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे निमंत्रण त्यांनी यावेळी स्विकारले.
एच.के.पाटील यांच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेतील गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री नसीम खान, बी.संतोष, आबा दळवी, यादव यांचा समावेश होता.