Sunday, December 22, 2024
Homeराज्यभाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार - निष्ठावंतांच्या बैठकीत निर्णय...

भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार – निष्ठावंतांच्या बैठकीत निर्णय…

सांगली – ज्योती मोरे

ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजपाच बीज रोवून रोपटे वाढवलं, त्या निष्ठावंत, तळागाळातील गाव खेड्यात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना सध्या जिल्ह्यातील भाजपा जम्यात धरत नाही. जिल्ह्यासह प्रदेशातील नेतृत्व जाणून-बुजून अशा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत,येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील 200 कार्यकर्त्यांसह भाजपाच्या प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय, आज सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरामध्ये झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हे निष्ठावंत कार्यकर्ते बैठका घेऊन आपली भूमिका मांडत असूनही, जिल्हा अथवा प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची विचारपूस आजतागायत झाली नसल्याने व या प्रसिद्धीच्या गर्दीत भाजपाचा मूळ निष्ठावंत कार्यकर्ता बाहेर फेकला जात असल्याचे दुःख सलत असल्यानेच, सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराओ घालून जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आलाय.शिवाय सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रदेशच्या पदाधिकार्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे .त्या अगोदर शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन प्रदेश कार्यकारणीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .एवढे करूनही भाजपा प्रदेश कार्यकारिणीला जाग येत नसेल तर, पुन्हा एकदा भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागेल.

असा सूरही सदर बैठकीत उमटला आहे.एकूणच काय तर, निष्ठावंत कार्यकर्ते आता आपल्या न्याय हक्कासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.सदर बैठकीस प्रताप पाटील, प्रदीप वाले,डॉक्टर योगेश लाड, विनायक खरमाटे ,ऍडव्होकेट श्रीपाद अष्टेकर, भारत निकम, संजय हिरेकर संजय कोरे, भगवान पाटील,सुरेश कोरे आदी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: