पनवेल – किरण बाथम
आज रायगड जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी बसली आहे. शिवसेनेचे शिवबंधन सोडून खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी अवधूत तटकरे यांनी शिवबंधन बांधले होते. परंतु महाविकास आघाडी शासन काळात त्यांच्यावर शिवसेनेने लक्ष दिले नव्हते. राजकारण व जनसंपर्क यापासून दूर राहून त्यांनी काही वर्षे फक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते.
आज मुंबईत भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती येथे प्रदेश भाजप अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित होते.
भाजप सारख्या राष्ट्रीय विचाराच्या पक्षात प्रवेश करतांना आपल्याला आनंद वाटतोय.रायगड जिल्ह्यात ज्या भागात भाजपसाठी अत्यावश्यक आहे. त्या ठिकाणी पक्षादेशानुसार कार्य करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेण्याची भुमिका त्यांनी मांडली.
अवधूत तटकरे यांचा प्रवेश हा महाविकास आघाडीला पर्यायाने खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा आघात मानता येईल. कारण अवधूत तटकरे यांची रोहा नगर परिषद नगराध्यक्ष आणि श्रीवर्धन मतदार संघांचे आमदार म्हणून मोठी नावाजलेली कारकीर्द आहे. प्रशासनावर मजबूत पकड ठेवण्यात ते माहीर आहेत. विशेषतः युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्यांना मानतो. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा भाजपला मोठा लाभ देणारा ठरणार आहे.