नरखेड
गेल्या आठ दिवसापासून नरखेड भारतीय जनता पक्षाकडून रेल्वे जंक्शन बाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषण व धरणे आंदोलनाची केंद्र सरकार किती दखल घेते याकडे सर्व नरखेड व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी शिष्टमंडळाची यशस्वी बोलणी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. नरखेड रेल्वे जंक्शन वर किती एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत होतो हा कुतूहलाचा विषय झाला आहे.
कोरोनापूर्व काळात नरखेड रेल्वे जंक्शन वर ३० एक्सप्रेस गाड्यांचे थांबे होते. परंतु कोरोनाउत्तर काळात एकाही एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही . गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीयमंत्री ना . नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य भाजप अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विनि वैष्णव , रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे मध्यस्ती करून सर्वपक्षीय शिस्तमंडळाकडून अनेक निवेदने दिली. परंतु एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत झाला नाही. मिळालेली आश्वासने जुमलाच ठरलीत. स्वता बावनकुळे यांनी काटोल रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन केले . परंतु रेल्वे प्रशासनाने नरखेड काटोल ला एक्सप्रेस गाड्यांचे थांबे दिले नाही.
आश्वासनात थांब्या करीता केवळ तारीख पे तारीखच मिळाली. याचा परिणाम सोशल मीडिया व परिसरातील नागरिकांमध्ये भाजप विरुद्ध रोष वाढायला लागला. केंद्र व राज्यात भाजप ची सत्ता आहे . नागरिकांच्या नाराजीचा सामना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना करावा लागत आहे. या कारणाने स्थानिक भाजपने भाजप शासित केंद्र सरकार च्याच विरुद्ध गेल्या आठ दिवसापासून साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले.
आंदोलनात नागरिकांच्या एकीचे दर्शन
भाजप ने सुरू केलेल्या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या विरोधी पक्षांसह सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदविला.स्थानिक राजकीय विरोधक ही एकत्र आलीत. प्रत्येक राजकीय गट आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले. ग्रामपंचायती, अनेक सामाजिक संघटना, धार्मिक देवस्थान, मंडळ शेतकरी वर्ग , महिला बचत गट जेष्ठ नागरिक, विद्यार्थी , नोकरदार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधण्याकरिता सामूहिक महाआरती , नमाज अदा, बौद्ध वंदना असे उपक्रम आंदोलनस्थली राबविण्यात येत आहे.
शिष्टमंडळ दिल्ली ला
ना . नितीन गडकरी यांनी आंदोलनाची माहिती घेऊन शिष्टमंडळा ला दिल्लीला पाचारण केले. भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात उकेशसिग चौव्हन , सुरेश शेंदरे, श्याम बारई, संजय कामडे, रुपेश बारई ,मनीष दुर्गे शिस्टमंडळाने रेल्वेमंत्री ना. अश्विन वैष्णव यांच्यासोबत चर्चा केली. सकारात्मक चर्चा होऊन आंदोलनाबाबत योग्य निर्णय लागेल अशी आशा व्यक्त होत आहे.
खासदार नॉट रीचेबल
रेल्वे थांबे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. केंद्रात या भागाचे लोकसभा सदस्य बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे प्रतिनिधित्व करतात . गेल्या कित्येक महिन्यापासून ते या भागात फिरकले नाही. नवरात्र दरम्यान रात्री सर्वत्र सुनसान झाल्यानंतर गुपचूप मंडळांना भेट देऊन निघून गेले. त्यांनी नागरिकांच्या समस्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. या व्यतिरिक्त कोणीही मोठा पदाधिकारी किंवा नेते आंदोलनस्थळी फिरकले नाही.