सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे
सांगली : कोरोना काळातील दिवंगत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना नियमानुसार देय सानुग्रह मदत तसंच शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा योजनेनुसार सेवेत सामावून घेण्यात यावे. वेतन अनुदानासाठी अघोषित आणि घोषित शाळाना अनुदान त्वरित लागू करावे,वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी वय वर्षे 55 पेक्षा अधिक असलेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे प्रशिक्षण अटीतून वगळण्यात यावे तसेच प्रशिक्षण न झाल्याच्या कारणाने संबंधितांचे पेन्शन प्रस्ताव नाकारण्यात येऊ नयेत, शिक्षक शिक्षकेतर पदांची भरती करण्यात यावी.
संच मान्यतेच्या 13 जुलै 2020 व 4 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकातील जाचक तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी शिपाई या संवर्गातील भरती नियुक्ती प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के वेतनावरच करण्यात यावी, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी, सर्व प्रकारची थकीत बिले त्वरित मंजूर करण्यात यावीत, प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षकांची विशेष शिक्षक पदे भरण्यात यावीत यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर अध्यक्ष हाजी साहेब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष एन डी कांबळे, प्रसिद्धीप्रमुख सुभाष शिंदे, चंद्रकांत ऐवळे, बाळासाहेब बालगीत अमीन शेख अजहर शेख, वायदंडे सर, कदम सर, बनसोडे सर, कुलकर्णी सर, खोत सर आदी मान्यवर उपस्थित होते.