अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत होते. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्यासह पथक ईडी कार्यालयात पोहचले. आता येथे ईडी संजय राऊत यांची चौकशी करणार आहे.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर खोटी कारवाई, लोकांना मारहाण करून खोटे पुरावे बनवले जात आहेत. हे फक्त महाराष्ट्र आणि शिवसेना कमकुवत करण्यासाठी आहे पण महाराष्ट्र आणि शिवसेना कमकुवत होणार नाही. संजय राऊत झुकणार नाहीत आणि पक्षही सोडणार नाहीत.
यानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाकडे निघाले. मात्र, तेवढ्यात पत्रकारांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी कारवाईवर आनंद व्यक्त केल्याचं सांगत त्यावर प्रश्न विचारला. यावर अचानक मागे वळत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय, पेढे वाटा. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. आनंद व्यक्त करणारे बंडखोर आमदार बेशरम लोक आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे.”