जास्त हानी असलेल्या अमरावती शहरातील तीन आणि जिल्ह्यातील सहा वाहिनीवरील ग्राहकांची होणार तपासणी…
अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात राबविलेल्या महामोहीमेत अमरावती शहरासह जिल्ह्यात महावितरणने राबविलेल्या मीटर तपासणी मोहिमेत तब्बल १८६ मीटरमध्ये छेडछाड करून गती मंद केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजग्राहकांवर वीजकायदा २००३ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महावितरणच्या सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी धडक मोहीम हाती घेतली असून जास्त वीजहानी असलेल्या अमरावती शहरातील ताज, ईमाम नगर,आणि चित्रा फिडर तर अचलपुर येथील ११ केव्ही करजगाव,नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ११ केव्ही काजणा गावठान आणि चांदूर बाजार येथील ११ केव्ही चांदुरबाजार फिडर वरील वीज ग्राहकांची तपासणी करण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यात राबविलेल्या धडक कारवाईत अमरावती शहरातील चित्रा,ताज व इमाम नगर वाहिनीवरील ११५ वीज ग्राहक थेट वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले.यापैकी काही ग्राहकांनी मीटर बायपास केले होते तर काही ग्राहकांचे मीटर मंद गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.याशिवाय या तीन वाहिनीवर १६५ ठिकाणी आकोडे टाकून थेट वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तीन वाहिनीवरील ७१ ग्राहकांनी मीटरची गती संत करत वीज चोरी करत असल्याचे उघड करण्यात आले आहे.
सदरील ग्राहकावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करणे चालू आहे. ताज,ईमाम नगर व चित्रा वीजवाहिनीवर सरासरी ६७.३७ टक्के वीज गळती असल्यामुळे सदरील वीज गळती २१.६५ टक्क्यांपर्यंत कमी करणे, त्याचबरोबर करजगाव,काजणा गावठाण वीजवाहिनीवर सरासरी ६६.८५ टक्के वीज गळती असल्यामुळे सदरील वीज गळत २० टक्क्यापर्यंत कमीकरणे आणि चांदूर बाजार वाहिनीवरील वीज गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्यासाठी विविध पथके तयार करून भरारी पथकाच्या मदतीने नियोजनबध्द मोहिम राबविण्यात येत आहे.सदरील मोहीम चालू झाल्यानंतर ईमाम नगर वाहिनीवरील भार २० ॲम्पीअरने आणि ताज व चित्रा वाहिनीवरी भार २५- २५ ॲम्पीअरने कमी झाला आहे. त्याचबरोबर रोहीत्रातील फ्युज जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ग्राहकांच्या विद्दूत पुरवठ्याबाबतच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. सदरील वाहिनीवर ग्राहकांचे मीटर तपासणी व मीटर बदलण्याचे काम सुरू आहे.