अमोल साबळे
रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकांना डिसेंबरपर्यंत मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे.
एप्रिल 2020 मध्ये सुरू झाली होती योजना – केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात ही योजना सुरू केली होती. नंतर मार्च 2022 मध्ये ती सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. आता सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत हिची मुदत वाढविली आहे. मात्र, काही माध्यमांत ही योजना सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
80 कोटी लोकांना होणार फायदा – सरकारच्या या घोषणेनंतर थेट 80 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना आणखी पुढे वाढविण्यासंदर्भात संकेत दिले होते. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे.
3.40 लाख कोटी खर्च – सरकारच्या या योजनेवर आतापर्यंत एकूण 3.40 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील सर्वच गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते.