नांदेड – महेंद्र गायकवाड
लातूर जिल्ह्यातील वैशालीनगर निवळी ता. ्जि. लातूर येथील विलास सहकारी साखर कारखानातील ऊसतोड कामगार व ट्रॅक्टर पुरवठादार वडार समाजातील बालाजी पवार यांचे ऊसतोड ठेकेदारांनी त्यांचे दोन ट्रॅक्टरसह चार दिवसापासून अपहरण केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत कारवाई सुरू केली आहे.
नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील रहिवासी वडार समाजातील बालाजी बाबा पवार यांच्याकडे दोन ट्रॅक्टर असून ते ऊसतोड कामगार म्हणून देखील मजूर पुरवठा करत असतात. त्यांनी मुखेड तालुक्यातील ऊसतोड ठेकेदार मधुकर दिगंबर बरगे यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व दहा मंजुर (कोयते) ऊस तोडीसाठी कामास लावले होते.
मोबदल्यात बरगे यांनी पवार यांना काही रक्कम देऊ केली होती. परंतु सदर कामात अडथळा आल्यामुळे बंद झाले. त्यामुळे ऊसतोड ठेकेदार बरगे व त्यांच्या सहा साथीदारांनी दि. 05 जानेवारी 2025 रोजी नायगाव बसस्थानक समोरून अपहरण केले आहे.
याप्रकरणी अपहर्त्याची पत्नी सारजाबाई बालाजी पवार यांनी नायगाव पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून बजरंग मधुकर बर्गे, मधुकर दिगंबर बर्गे, गोविंद जयसिंग टेकाळे, अंकुश श्रीराम खनपट्टे, सर्व रा. डोंगरगाव ता. मुखेड व संभाजी आनेराय रा. शेळगाव ता. नायगाव, सुभाष कल्याणकर यांचे विरोधात गु.र नं. 07/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 140 (3) 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. साईनाथ नागोराव सांगवीकर करीत आहेत.