आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्याच्या चोहट्टा बाजार परिसरातील वीटभट्ट्यांची आकोट महसूल पथकाकडून तपासणी सुरू झाली असून या तपासणीमध्ये विविध त्रूट्या आढळल्याने एका वीट भट्ट्यावर दंडनिय कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये या वीट भट्टा मालकास ७ लक्ष रुपयांचे वर दंड आकारला गेला असून पुढील आदेशापर्यंत वीट भट्टा बंद ठेवण्याचे आदेशही या वीट भट्टा धारकास देण्यात आले आहेत.
वीट भट्टा धारकांवर अनेक निर्बंध लादून दरसाल महसूल विभागाद्वारे या भट्ट्यांची नियमित तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने आकोट तालुक्याच्या चोहट्टा बाजार महसूल मंडळातील वीट भट्ट्यांची तपासणी करणे सुरू झाले आहे. या दरम्यान मौजे पिलकवाडी येथील वीट भट्टा धारक प्रवीण सुभाष मुंडाले यांचेवर दंडनिय कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना ७ लक्ष २ हजार ४८० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
या वीटभट्ट्यांवर ८ टाप अर्थात १६ मजूर कार्यरत आहेत. त्या ठिकाणी एकूण ४ भट्ट्या सुरू आहेत. या ठिकाणी ५ लक्ष ८६ हजार कच्च्या विटा तर ३ लक्ष पक्क्या विटा अशा एकूण ८ लक्ष ८६ हजार विटांसह २ हजार ९२७ ब्रास माती आढळून आली. २४० रुपये ब्रास प्रमाणे ह्या मातीवर ७ लक्ष २ हजार ४८० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. या सोबतच हा वीट भट्टा सुरू करण्याकरिता आवश्यक असलेली ना हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यात आलेली नसल्याचेही आढळून आले.
यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यातच आलेले नाही. सोबतच राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांच्या सक्षम अधिकाऱ्यांचेही ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. पाटबंधारे विभागाचेही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
वीट भट्टा सुरू करण्यापूर्वी करावा लागणारा हंगामी अकृषिक कराचा भरणाही केलेला नाही. वीट भट्टा संदर्भात काही नियम, अटी व शर्तीची पूर्तता करावी लागते. त्यानुसार दोन वीट भट्ट्यांमधील अंतर एक किलोमीटरचे वर असणे अपरिहार्य आहे. मात्र हा वीट भट्टा जितेंद्र डाके रा. करोडी यांचे वीटभट्ट्यापासून एक किलोमीटर अंतराचे आत आहे.
या त्रुटींमुळे हा वीट भट्टा सील करण्यात आला. सोबतच पुढील आदेशापर्यंत हा वीट भट्टा बंद ठेवण्याचे आदेशही वीट भट्टा धारक यांना देण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉ. विजय चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मानकर, मंडळ अधिकारी अनिल ओईंबे, तलाठी महेश सरकटे, सुरक्षारक्षक हिंगणकर तथा अन्य सहकारी यांचे पथकाने केली आहे.