शेगांव : डोक्यावरचे केस हे माणसाच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा तो महत्त्वाचा भाग असतो. महिलांच्या सौंदर्याचे एक कारण म्हणजे त्यांचे केस. डोक्यावरचे केस इतके महत्त्वाचे आहेत की केसांची काळजी घेण्यासाठी लोक महिन्याला हजारो रुपये खर्च करतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील काही गावात एक विचित्र आजार झाल्याने लोकांना टक्कल पडल्याची घटना समोर येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडालीय. तर गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारने थैमान घातले असल्याचे समोर आलेय. गावातील कुटुंब या व्हायरस चा बळी ठरत आहेत. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपणीसाठी पाठवण्यात आले आहे. पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार आहे की नेमंके याच कारण काय आहे.
केस गळणे आणि टक्कल पडण्याचे कारण म्हणून या रुग्णांनी वापरलेला शैम्पू डॉक्टरांना प्रथम संशयास्पद होता, परंतु अनेक रुग्णांनी त्यांच्या आयुष्यात कधीही शॅम्पू वापरला नाही. त्यांचे केसही गळत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक पसरलेल्या या आजारामुळे आरोग्य विभागही हैराण झाला आहे. याची माहिती तहसील आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर प्रशासनाला दिली आहे. टक्कल पडण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.