Saturday, January 4, 2025
Homeराज्यआणि भारसाखळे यांनी परजली समशेर…केले ११ जणांचे शिरकाण…स्वतः मात्र बनलेत सती सावित्री…

आणि भारसाखळे यांनी परजली समशेर…केले ११ जणांचे शिरकाण…स्वतः मात्र बनलेत सती सावित्री…

आकोट – संजय आठवले

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये आकोट मतदार संघातील भाजप उमेदवाराचे विरुद्ध कटकारस्थान करून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवीत अकोला जिल्हा भाजप अध्यक्षांनी किसान आघाडी व ओबीसी आघाडीच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांसह एक ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य व अन्य ८ अशा ११ जणांना भाजपमधून सहा वर्षांकरिता निलंबित केले आहे.

ही कारवाई स्थानिक मंडल अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरून करण्यात आली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे दोन्ही स्थानिक मंडल अधिकारी आमदार प्रकाश भारसाखळे यांचे ताटाखालील मांजरे असल्याने ही कारवाई त्यांचेच सांगण्यावरून झाली असल्याचे सांगणे न लगे. परंतु या कारवाईत पक्षविरोधी महाकटकारस्थान करणारे प्रकाश भारसाखळे मात्र स्वतः अगदी सती सावित्रीचा वेश पेहरून बसले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणूक आटोपली. जुने वर्षही निरोपाच्या वळणावर उभे आहे. अशा स्थितीत नवीन योजना घेऊन येत्या वर्षाचे स्वागत करणे ऐवजी आकोटचे आमदार प्रकाश भासाखळे मात्र सरत्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात आपले जुने हिशेब पूर्ण करण्याची कवायत करीत असल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्याच दावणीत बांधलेल्या राजेश रावणकार आणि हरीश टावरी या दोन शिकाऱ्यांना भारसाखळे यांनी पुढे केले आहे.

त्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या बंदुकीने टप्प्यात आलेल्या अकरा सावजांची शिकार भारसाखळे यांनी साधली आहे. त्यामध्ये ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विशाल गणगणे, किसान आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र पुंडकर, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य विष्णू बोडखे, जि. प. सदस्य प्रकाश आतकड, पं. स. सदस्य राजेश येऊल, आकोट न.प. माजी सभापती मंगेश चिखले, माजी तालुकाध्यक्ष डॉ. अरविंद लांडे, माजी तालुका सरचिटणीस राजेश पाचडे व सुनील गिरी, युवा मोर्चा माजी सरचिटणीस निलेश तिवारी तथा अकोला ग्रामीणच्या माजी युवती प्रमुख कु. चंचल पितांबर वाले यांचा समावेश आहे. या लोकांवर ही कारवाई अकोला भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे काही चिकित्सकांनी या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांचे मते ॲड. विशाल गणगणे, प्रा. राजेंद्र पुंडकर आणि विष्णू बोडखे या तीन प्रदेश पदाधिकाऱ्यांवर जिल्हाध्यक्षांनी केलेली कारवाई अनुचित आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अथवा संपूर्ण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचे कडून कारवाई होणे संयुक्तिक आहे. त्यामुळे या तीन पदाधिकाऱ्यांवरील ही कारवाई असंबद्ध आहे. मात्र ज्या लोकांना “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” हे ठाऊक आहे, त्यांनी मात्र या कारवाईस मुक संमती दर्शवली आहे.

परंतु या कारवाईने जनतेत मात्र “वादल वार सुटलं गो जन मनात तुफान उठलं गो” अशी स्थिती झाली आहे. आणि या वादळ वाऱ्यात भारसाखळे यांच्या गत पापांच्या वावड्या इतस्ततः उडू लागल्या आहेत. झाल्या विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कटकारस्थान करण्यात भारसाखळे हे सुद्धा कुठेच कमी पडले नाहीत. किंबहुना इतरांपेक्षा त्यांनीच अधिक पुढाकार घेतला. इतका की त्यांनी दर्यापूर मतदारसंघात चक्क पक्ष विरोधात उमेदवार उभा करून त्याचे करिता जाहीरपणे मते मागितली आहेत.

त्यामुळे तेही अशा कारवाईचे पूर्ण हक्कदार आहेत. कर्णोपकर्णी असा संदेश देत ह्या वावड्या आसमंतात विहरत आहेत. त्यासोबतच आकोट मतदार संघातील भाजपमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडून आल्यावर भारसाखळे सुडाचे राजकारण सुरू करतील की त्यांची भीती आता सार्थ ठरू लागली आहे.

महत्त्वाचे म्हणजे ह्या ११ जणांवरील ही निलंबनाची कारवाई आकोट शहर भाजप अध्यक्ष हरीष टावरी आणि तालुका अध्यक्ष राजेश रावणकार यांचे पत्राचे आधारे करण्यात आली आहे. परंतु ह्या ११ लोकांच्या कागाळ्या करताना हरीश टावरी हे विसरले कि, त्यांचा गतकाळ अनेक अपराधिक कारनाम्यांनी भरलेला आहे. भारसाकळे यांचे मदतीने त्यांनी जलशिवार योजनेत शासनाची फसवणूक करण्याचे पातक केले आहे. ह्या पातकात त्यांनी आपल्या धर्मपत्नीलाही ओढले आहे.

ह्या पातकावर पांघरून घालणेकरिता टावरी यांनी आकोट पालिका मुख्य अधिकाऱ्यांवर भारसाखळे यांचे दडपण आणून पालिका मालमत्तेची चोरी केली आहे. याबाबत महाव्हाईस सविस्तर उलगडा करणारच आहे. परंतु आपण इतके घाणीने परबटलेले असल्यावरही पक्षातील निष्ठावानांची तक्रार टावरी यांनी केली आहे. या निलंबितांचा दोष इतकाच कि, त्यांनी केवळ भारसाखळे यांचे उमेदवारीस विरोध केला. यातील काहींनी स्वतः करिता उमेदवारी मागितली, तर काहींनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराची शिफारस केली.

या बाबींवरून आकोट मतदार संघातील आपला शेवटचा काळ आमदार भारसाखळे सुडाच्या राजकारणात घालविणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आणि खेदजनक बाब ही की ह्या सुडाच्या राजकारणाकरिता त्यांनी कुऱ्हाडीचा दांडा म्हणून आकोटच्याच लोकांना वेठीस धरले आहे. त्यातच आतील खबर आहे कि, भारसाखळे यांचे निशाण्यावर बरेच भाजपाई आहेत.

ज्यांना येत्या काळात “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” दिला जाणार आहे. काहींना पक्षीय कार्यक्रमातून बाद केले जाणार आहे. त्यामुळे दर्यापूरचे भारसाखळे येत्या नव्या वर्षात आकोटात काय खेळ खेळतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: