१५ ग्राम पंचायतींनी घेतला स्वतंत्र देवलापार तालुका बनवण्याचा ठराव…
रामटेक – राजु कापसे
रामटेक तहसील मधील देवलापार क्षेत्रात स्वतंत्र तहसील बनवण्याच्या मागणीने जोर पकडला आहे, क्षेत्रातील लोकांना आजही तालुक्याच्या कामाने रामटेकला जावे लागते. ज्यासाठी लोकांना ६०-७० किमी पर्यंतची पायपीट करावी लागते.
या सर्व गोष्टीं बघता देवलापार येथे अप्पर तहसील कार्यालय बनवले गेले तरी सुद्धा संपूर्ण कामे वेळेवर होत नसल्याने व पूर्ण तहसीलचा दर्जा न नसल्याने लोकांना आजही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.देवलापार अप्पर तहसील कार्यालय क्षेत्रात एकूण ७२ गांवे येत असून त्यात १५ महसूल साझे व ३ मंडळांचा समावेश आहे.
या सर्व बाबीं लक्षात घेता क्षेत्रातील १७ पैकी १५ ग्राम पंचायतीनी विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून देवलापार येथे स्वतंत्र तहसील बनवण्याची मागणी करतांना हिवाळी अधिवेशन काळात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकाच दिवशी ठराव पारित केला आहे.
यासाठी मुर्सेनाल, नॅशनल गोंडवाना सोडुम संघटनेचे ॲड. मुकेशदादा पेंदाम व ग्रामपंचायत सदस्य मनीष जवंजाळ यांनी विशेष प्रयत्न करून सर्व ग्राम पंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेटी घेऊन चर्चा केली व या विषयासाठी त्यांना प्रेरित केले व एकाच दिवशी ठराव घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले. लवकरच स्वतंत्र तालुका निर्माण होऊन इथल्या लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा परीसरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.
देवलापार तालुका व्हावा याकरिता ठराव देवलापार, करवाही, खनोरा,टांगला,लोधा (पिंडकापार), बेलदा, बांद्रा, कट्टा, सालई, बोथिया पालोरा, दाहोदा, वडांबा, डोंगरताल, हिवरा बाजार, पिपरिया इत्यादी ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर वरघाट आणि पथराई ग्राम पंचायतने कोणतीही गांभीर्य दाखवले नाही. यांना देवलापार तालुक्याच्या गरज नाही हे दिसून येते.
टप्प्याटप्याने झाले नायब व अप्पर तहसील कार्यालय
देवालापारला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या २५ वर्षांपासुन सुरु आहे. परंतू या भागावर शासनाचे दुर्लक्षच राहिले. २०१४ मध्ये मुकुल वासनिक केंद्रात मंत्री असतांना नायब तहसीलदार कार्यालय सुरु करण्यात आले. २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लक्षात घेता २०१८ मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय सुरु करण्यात आले. परंतू त्यानंतर कोणताही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अध्यापही देवलापारला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही.
आदिवासी क्षेत्रात दुर्गम भाग व वाहनांची पाहिजे तशी व्यवस्था नसल्याने आजही लोकांना तालुक्याच्या कामासाठी पायपीट करावी लागते,लोकांना आपली रोजी व खिशातले पैसे असे दुहेरी नुकसान करून सुद्धा तहसीलच्या चकरा माराव्या लागतात त्यामुळे देवलापर तालुका बनने याची नितांत आवश्यकता आहे.
ॲड. मुकेशदादा पेंदाम
मुर्सेनाल नॅशनल गोंडवाना सोडूम संघटना
सध्या अपर- तहसील कार्यालय देवलापार येथे सुरू आहे. परंतु तिथे तहसीलच्या माध्यमातली सगळी कामे होऊ शकत नाही त्यामुळे येथील नागरिकांना रामटेक ला जाण्या शिवाय पर्याय नाही. देवलापार तालुका झाल्यास क्षेत्रातील असंख्य गोरगरीब आदिवासी बंधू-भगिनीना न्याय मिळू शकेल तसेच या भागातील विकासाला सुद्धा चालना मिळेल.
मनीष जवंजाळ
संयोजक देवलापार तालुका निर्माण संघर्ष समिती