नांदेड – महेंद्र गायकवाड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 21 डिसेंबर रोजी रात्री 10.50 वाजता नांदेड येथील श्री. गुरु गोबिंद सिंग जी विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान केले.ते परभणी येथे सायंकाळी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते.
नांदेड विमानतळावर त्यांचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत आ.अमोल मिटकरी, आ.रत्नाकर गुट्टे, आ.राजेश विटेकर उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांना निरोप दिला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी दुपारी त्यांचे लातूर येथे आगमन झाले व त्या ठिकाणाहून ते परभणीला गेले. परभणी येथे श्री. पवार यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून घटनाक्रम ऐकून घेतला.
परभणीत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. तसेच नवा मोंढा पोलीस स्टेशनमधील पोलीसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील घटनास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्याही कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जावून सांत्वनपर भेट घेतली.परभणी वरून नांदेड येथे त्यांच्या आगमन झाले व रात्री १०.५० वाजता ते मुंबईकडे रवाना झाले.