अकोला : अकोला नगरीचे आराध्यदैवत शिवजी भगवानचे श्री. राजराजेश्वर मंदिराचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करून त्यानुसार विकास आराखडा तयार करीत मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी हिवाळी अधिवेशनात केली. गेल्या तीस वर्षापासून राज राजेश्वर मंदिराच्या विकासाचा प्रश्न कधीच विधिमंडळात पोहोचला नव्हता तो शुक्रवारी काँग्रेस आमदार साजिद खान यांनी अभ्यास पूर्ण पद्धतीने मांडत सरकारचे लक्ष याकडे केंद्रित करून घेतले; हे विशेष !
राज राजेश्वर नगरी म्हणून अकोल्याची ओळख संपूर्ण देशात आहे. तर अकोला नगरीतील शिवजी भगवानचे असलेले राजेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन असून तब्बल ४०० वर्ष जुने आहे. संपूर्ण शहर वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा संपूर्ण अकोलेकरांची ईच्छा आहे. सरकार स्थापन झाल्यापासून नागपुरात होत असलेले हिवाळी अधिवेशन हे या सरकारचे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात प्रथमच आमदार झालेले साजिद खान यांनी अकोलेकारांची श्रद्धास्थान असलेले राज राजेश्वर भगवान यांचे पुरातन मंदिराच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. यावेळी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मागणी करीत सांगितले की, अकोल्यातील राज राजेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर असून याचा समावेश ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा यादीत करण्यात यावा, सोबतच त्याचा तब्बल ५०० कोटींचा विकास आराखडा तयार करीत लवकरच कामाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली. सदर मंदिर भव्य दिव्य रुपात उभे राहावे अशी माझ्यासह सर्वच अकोलेकारांची इच्छा आहे, असे सुद्धा यावेळी आ. साजिद खान म्हणाले. पहिल्याच अधिवेशनात आ. साजिद खान यांनी मंदिर विकासाचा प्रश्न लावून धरल्याने त्यांचे अकोलकर तसेच राज राजेश्वर भक्तांकडून कौतुक होत असून आभार मानल्या जात आहे.
मनपाच्या अवाजवी करवाढीचा विरोध
मनपात भाजपाच्या सत्तेत शहरातील मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात करवाढ करण्यात आली. सदर करवाढ संदर्भात काँग्रेस नगरसेवक झिषान हुसैन यांनी हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती, सदर याचिकेत आलेल्या निर्णयाविरुद्ध मनपाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. शहरात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कुठल्याही प्रकारचा विकास करण्यात आला नाही, चार दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र मालमत्ता करात झालेली वाढ ही अवाजवी असून त्याचा विरोध दर्शवित त्यावर तोडगा काढण्याची मागणी यावेळी अधिवेशनात त्यांनी केली.
गोगो सिगरेट, गांजाची खुलेआम विक्री
शहरात गोगो सिगरेट आणि गांजा सहजपणे पानपट्टी, किराणा दुकानांवर आढळून येत आहे. परिणामी शहरातील युवा पिढी ही व्यसनाधीन होत आहे. हा विषय शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे. परिणामी व्यसनाधीन होण्यापासून युवा पिढीला वाचविण्यासाठी यावर त्वरित बंदी आणण्याची मागणी आ. साजिद खान यांनी केली.
शहींशाहे बरार हजरत शाह जुल्फिगार दर्गाचे सुशोभीकरण करण्यात यावे
शहरातील गडंकी रोडवर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या शेजारी असलेली शहींशाहे बरार हजरत शाह जुल्फिकार दर्गा ही सुद्धा पुरातन आहे. या दर्गाची निर्मिती नदी किनारी असून त्याचे सुद्धा सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी आ. साजिद खान यांनी केली.