Saturday, December 21, 2024
Homeराज्यमुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीची वकिली करावी आणि बॅलेटपेपरवर निवडणुक घ्यावी...

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीची वकिली करावी आणि बॅलेटपेपरवर निवडणुक घ्यावी : नाना पटोले…

भारत जोडो यात्रेत असामाजिक तत्वे होती तर कारवाई का केली नाही?

नागपूर – विधानसभा निवडणुकीतील भाजपा युतीच्या विजयावर जनतेचा विश्वास बसलेला नाही. हे सरकार आपल्या मतांचे नसून निवडणुकीत काहीतरी घोटाळा झाला असल्याची जनतेची भावना आहे.

७६ लाख मते कशी वाढली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिले नाही पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारकडवाडीच्या लोकांची वकिली करावी व बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडत काहीही घोटाळा झाला नसल्याचे विधानसभेतील चर्चेत सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचा समाचार घेत नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद राहिली आहे, मतदारांची नावे वगळणे, नवीन नावांचा समावेश करणे यातील गैरकारभार व मतांची टक्केवारी यावर शंका उपस्थित केली जात आहे.

रात्रीच्या अंधारात ७६ लाख मते कशी वाढली, याची विचारणा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे पण अद्याप आयोगाने त्यावर उत्तर दिले नाही. मारकवाडीच्या जनतेने याविरोधात आवाज उठवला पण सरकारने पोलीसांच्या मदतीने त्यांना मॉक पोलिंग घेऊ दिले नाही.

आता अनेक ग्रामसभा बॅलेटपेपरवरच निवडणुका घ्या असे ठराव करत आहेत. जनतेच्या या भावनांचा आदर केला पाहिजे तो होताना दिसत नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे अपेक्षित आहे ती मुख्यमंत्री का देत आहेत, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला व डरो मत चा नारा दिला. पण या यात्रेत असामाजिक तत्वे होती असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत, त्यांना आता त्याची आठवण होण्याची गरज काय, जर भारत जोडो यात्रेत असामाजिक तत्वे होती तर राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारने काय केले, भाजपा सरकारने त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई का केली नाही. काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या जीवाला धोका होता तरीपण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. ज्या यात्रेची जगाने दखल घेतली त्या यात्रेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: