आकोट – संजय आठवले
आकोट शहर पोलीस ठाण्याचे पोऊनि राजेश जवरे यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर आकोट पोलीस ठाणे अंतर्गत लाच प्रतिबंधक विभागाचे सापळ्यात अडकलेले सपोनि राहुल देवकर हे आता उच्च न्यायालयाच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांना मिळालेल्या अटकपूर्व जामीनाला लाच प्रतिबंधक विभाग अमरावती तथा आकोट शहर पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालय नागपूर येथे १६ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी कि, आकोट शहरात अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याबाबत रवींद्र राधाकिसन कासट यांचे विरोधात सह. दुय्यम निबंधक आकोट यांचे कडे सन २०२१ मध्ये तक्रार करण्यात आली. त्या आधारावर कासटचे घरी धाड घालून दुय्यम निबंधक यांनी तपास सुरू केला.
तपास कार्य पूर्ण झाल्यावर दि. २०/ ३/ २०२४ रोजी रवींद्र कासटचे विरोधात आकोट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. प्रकरणाची चौकशी सपोनी राहुल देवकर यांचे सुपूर्द केली गेली. त्यांनी या प्रकरणी रवींद्र कासटच्या पत्नीला सह आरोपी केले. तिला आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
त्यानंतर रवींद्र कासटनेही अटकपूर्व जामीनाकरिता याच ठिकाणी अर्ज केला. यादरम्यान देवकर यांचे तपासात रवींद्रचा भाचा व जावई यांची नावे समोर आली. त्यावर भाचा, जावई आणि पत्नी यांना तपास कामी हजर करण्याची सूचना देवकर यांनी कासटला दिली.
तशी कारवाई नको असल्यास आणि न्यायालयात कमजोर चार्जशीट पाठवावयाची असल्यास आपणास दीड लक्ष रुपये द्यावे लागतील असे देवकर यांनी कासटला सांगितले. त्यावर पैशांची व्यवस्था करून तुम्हाला भेटतो असे कासटने त्यांना सांगितले.
परंतु देवकर यांना पैसे देण्याची अजिबात इच्छा नसल्याने रवींद्र कासट याने दि.५/४/२०२४ रोजी अमरावती लाच प्रतिबंधक विभागात जाऊन सपोनी राहुल देवकर यांचे विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीची लगेच दखल घेऊन अमरावती लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांनी त्याच दिवशी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.
परंतु त्या दिवशी राहुल देवकर आकोट पोलीस ठाण्यात हजर नव्हते. म्हणून ही पडताळणी दि.६/४/२०२४ रोजी करण्याचे ठरले. त्यानुसार रवींद्र कासट व त्याचे सोबत पंच क्र. १ प्रफुल्ल बडासे हे दोघे देवकरांना भेटण्याकरिता आकोट शहर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी देवकर ठाण्यात हजर होते.
त्यांनी कासट आणि त्याच्यासोबत अनोळखी इसम येत असल्याचे पाहिले. त्यावरून त्यांना धोक्याची कल्पना आली. त्यामुळे ते कासटशी काहीही वार्तालाप न करता तेथून निघून गेले. परंतु लगेच त्यांनी आकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार दामोदर यांचेशी संपर्क साधून कासटला त्यांचे फोनवर बोलण्यास सांगितले.
त्यावेळी त्यांनी पंच क्रम.१ प्रफुल्ल बडासे यांचे बाबत माहिती घेतली. आणि कासटला सायंकाळी पाच ते सात वाजताचे दरम्यान येण्यास सांगितले. त्यामुळे रवींद्र कासट घराकडे जाण्यास निघाला असता, त्याचे मोबाईलवर देवकर यांचा मिस्ड कॉल आला. त्यावर कासटने देवकर यांचेशी संपर्क साधला असता, देवकर यांनी कासटला ४.३० वाजता बयान देणेकरिता येण्यास सांगितले.
त्यावेळी लाच प्रतिबंधक अधिकारी केतन मांजरे यांनी पडताळणीची तयारी करून कासटला नियोजित वेळी शहर पोलीस स्टेशन आकोट येथे पाठविले. परंतु सपोनी राहुल देवकर तेथे नव्हते. त्यामुळे कासटने त्यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी दर्यापूर मार्गानजिकच्या डॉ. कोल्हे यांचे इस्पतळाजवळ येण्यास कासटला सांगितले.
त्यानुसार कासट नियोजित स्थळी गेला. त्यावेळी तेथे राहुल देवकर आपल्या वाहनात बसलेले आढळले. त्या ठिकाणी जाऊन कासटने देवकर यांचेशी पैशांबाबत तडजोड करण्याची विनंती केली. त्यावेळी देवकर यांनी दीड ऐवजी सवा लक्ष रुपये घेण्याची तयारी दर्शवली.
आणि लाच प्रतिबंधक विभागाची पडताळणी पूर्ण झाल्याने कासट तिथून परत आला. त्यावर लाच प्रतिबंधक अधिकारी यांनी सापळा लावण्याची तयारी केली. कासटने देवकरांना फोन करून रक्कम तयार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी कासटला त्याच ठिकाणी बोलावले. कासट तिथे गेला असता, देवकर पूर्वीच्याच वाहनात बसून असल्याचे त्याला आढळले.
कासटने त्यांचे जवळ जाऊन सव्वा लक्ष रुपये त्यांचे सुपूर्द केले. आणि मोहीम फत्ते झाल्याचा इशारा दिला. त्याच दरम्यान देवकर आपली गाडी सुरू करून निघण्याचे बेतात होते. तर दुसरीकडे काम झाल्याने लाच प्रतिबंधक अधिकारी देवकरांना ताब्यात घेण्यास सरसावले.
त्यांची लगबग पाहून देवकरांना आपण सापळ्यात अडकल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी गाडी न थांबविता ती गाडी सरळ पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांचे अंगावर घातली. धोक्याची जाणीव होताच मांजरे यांनी बाजूला उडी घेतली. त्याने ते थोडक्यात बचावले. या गडबडीत देवकर बेफाम वेगाने आपले वाहन चालवीत दर्यापूर कडे निघून गेले.
बसलेल्या धक्क्यातून सावरताच केतन मांजरे व त्यांचे सहकाऱ्यांनी आपल्या वाहनाने देवकरांचा पाठलाग केला. परंतु ते हाती सापडले नाहीत. शक्य तितका शोध घेऊनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही.
त्यावर झाल्या घटनेचा रीतसर पंचनामा करून केतन मांजरे आणि रवींद्र कासट यांनी सपोनी राहुल देवकर यांचे विरोधात आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या आधारे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७, मोटर वाहन अधिनियम १९८८ कलम १८४, भारतीय दंड संहिता १९६० कलम २७९, ३०८ अन्वये आकोट पोलिसांनी सपोनी राहुल देवकर यांचे विरोधात गुन्हा नोंदविला.
त्याचा तपास सुरू असल्याचे दरम्यान सपोनी राहुल देवकर यांनी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता याचिका दाखल केली. तिला मंजुरात देऊन तत्कालीन न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी रीतसर सुनावणीनंतर सपोनि राहुल देवकर यांना अटकपूर्व जामीन बहाल केला.
परंतु या आदेशाने व्यथित होऊन लाच प्रतिबंधक विभाग अमरावती पोलीस निरीक्षक केतन मांजरे आणि शहर पोलीस स्टेशन आकोट ठाणेदार यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामध्ये सपोनी राहुल देवकर यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका दि.९ डिसें. २०२४ ला मंजूर करण्यात आली असून त्या संदर्भात दि. १४ डिसें २०२४ रोजी सुनावणी ठेवण्यात आली.
परंतु या दिवशी दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. म्हणून या याचिकेवर सोमवार दि.१६ डिसें. रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे आकोट ठाण्याचे पोऊनि राजेश जवरे यांचा अटकपूर्व जामीन रद्द करणाऱ्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांचे समोरच ही सुनावणी सुद्धा होणार आहे.
त्यामुळे या संदर्भातही पोऊनि राजेश जवरे यांचे प्रमाणेच फैसला होण्याची अटकळ लावली जात आहे. यावेळी सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज ॲड. एच. डी. दुबे तर आरोपीतर्फे ॲड. के. आर. गिरीपुंजे व ॲड. संग्राम शिरपूरकर हे पाहणार आहेत. तूर्तास या खटल्याबाबत सर्वत्र कुतुहल निर्माण झाले आहे.