रामटेक – राजू कापसे
नुकत्याच पार पडलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे व समाज कल्याण नागपूर यांच्या वतीने 75 व्या संविधान महोत्सव अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक च्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुमारी येथील शाळेत संविधान उद्देशिका पाठांतर स्पर्धा पार पडली.
सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच सामूहिक संविधान उद्देशिकेच्या वाचनाने सुरुवात करण्यात आली. शाळेतील एकूण 19 विद्यार्थ्यांनी पाठांतर स्पर्धेत सहभाग घेतला त्यापैकी वीट भट्टी येथे राहणारी कामगारांची मुलगी इयत्ता दुसरीतील चिमुरडी रेशमी रमेश पैकरा हीचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक सहावीतील हंसिका ज्ञानेश्वर घोडमारे व सहावीतील करण राजेश वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे आयोजन व परीक्षण रामटेक तालुक्यातील समता दूत राजेश राठोड व मौदा तालुका समतादूत दुर्योधन बगमारे यांनी केले.
विजेत्यांना संविधान प्रत व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश ईनवाते होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका अंजली गणवीर यांनी केले. तर आभार शिक्षिका प्रीती ढवळे यांनी मानले. यावेळी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.