चान्नी ठाणे हद्दीतील “मळसूर” बनले माहेरघर…
पातूर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसूर येथे भेसळयुक्त देशी दारूची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. काही महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून संबंधित विभागाने केलेल्या कारवाईतून भेसळयुक्त देशी दारूची विक्री होत असल्याच्या ठिकाणी धाड टाकून नमुने घेतले होते.
त्यानंतर काही दिवसापर्यंत भेसळयुक्त देशी दारूच्या विक्रीला विराम दिल्यानंतर पुन्हा भेसळयुक्त देशी दारूच्या विक्रीला उधाण आल्याचे चित्र आहे. मळसुर येथे एका खोलीमध्ये इतर राज्यातील काही जण देशी दारूच्या बाटल्यामध्ये भेसळ करतात, तसेच या देशी दारूच्या दुकानातून चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जवळपास ३६ ते ३७ गावापर्यंत अवैधरित्या दारूचा धंदा करणाऱ्या दुकानदाराला देशी दारूच्या पेट्या घरपोच पोचून दिल्याची सेवा दिली जात असल्याचे चित्र आहे.
मळसूरसह परिसरातील ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधितांकडून तात्पुरता कारवाई केली जाते, त्यामुळे भेसळयुक्त देशी दारूच्या विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
भेसळयुक्त देशी दारूच्या नमुन्यांची चौकशी सुरू
गेल्या काही महिन्यापूर्वी मळसूर येथे भेसळयुक्त देशी दारूची विक्री होत असल्याच्या ठिकाणी संबंधित विभागाने छापा टाकला होता. आणि भेसळयुक्त देशी दारूचे नमुने घेतले होते. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुन्हा मळसूर येथे भेसळयुक्त दारूच्या विक्रीला उधान आले आहे.
दुकानदाराकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
भेसळयुक्त देशी दारू विक्री होत असल्याचे नमुने घेतल्याची चौकशी सुरू आहे. परंतु देशी दारू दुकानदाराकडून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाकडे मळसूरसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.