आकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघाचा निकाल घोषित झाल्यानंतर आता जय पराजयाच्या कारणांच्या वावड्या चहुबाजूने आसमंतात उडू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने अनेक मजेशिर, विदारक, चिंताजनक, भयावह, डोके बधिर करणारी कारणे समोर येऊ लागली आहेत. या कारणांचा साकल्याने विचार करता आकोट मतदार संघात भाजपवर सूज चढली असून काँग्रेसची कामगिरी समाधानकारक ठरली आहे. वंचीतची भयावह, तिसऱ्या आघाडीची चिंताजनक तर अन्य पायलीचे पन्नास स्थितीत असल्याचे जाणवत आहे.
निवडणूकीपुर्वी संपूर्ण मतदारसंघातील जनमत आमदार भारसाखळे यांचे विरोधात तयार झालेले होते. त्यांचे वय, त्यांचे स्थानिक नसणे, त्यांचे आजारपण याचीच सर्वत्र चर्चा होती. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात होता. परंतु निकालानंतर त्यांचे विजयाने संपूर्ण मतदारसंघ बुचकळ्यात पडून अवाक झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विजयाचा जल्लोषही कुठेच जाणवला नाही. कुठेच आतिषबाजीही झाली नाही. त्यामुळे त्यांचा विजय जनतेच्या पचनी पडला नसल्याची स्थिती जाणवत आहे. तरीही त्यांच्या व्यूह रचनेची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे.
त्यानुसार आकोट मतदार संघातील पुरुष निर्विवादपणे भारसाखळे यांचेवर नाराज होते. त्याउलट महिला वर्गात मात्र त्यांचे बाबत अंडर करंट धावत होता. परंतु भारसाखळे फार चांगला उमेदवार आहेत, त्यांची कार्यशैली जनमानसाला सुखावणारी आहे, त्यांचे व्यक्तिमत्व फार प्रभावशाली आहे अशी भावना महिला वर्गात अजिबात नव्हती. तर महिलांना काळजी होती लाडकी बहीण योजना बंद पडण्याची. यासंदर्भात भाजपाने केलेल्या जाहिराती प्रचंड असरदार ठरल्या. ज्यामध्ये महायुती सरकार न बनल्यास ही योजना बंद पडण्याची भीती दाखवण्यात आली होती.
त्याचा महाराष्ट्रभर अनुकूल परिणाम झाला. आकोट मतदार संघातील महिलाही त्या जाहिरातीने भारल्या गेल्या. परिणामी महिला वर्गाने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. भाजपा आपल्या जमातीचा दुस्वास करते. संविधान बदलण्याचा भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्याद्वारे आपल्या जमातीला जगणे कठीण केले जाणार आहे. याची कोणतीही चिंता दलित मुस्लिम महिलांना तर भाजपा आपल्याला वनवासी संबोधून आदिवासी म्हणून असलेला आपला अधिकार नष्ट करीत आहे. त्याद्वारे आपले विशेषाधिकार हिरावले जाणार आहेत. याचे कोणतेही भय आदिवासी महिलांनाही जाणवले नाही. त्यामुळे समस्त महिलावर्गाने प्रचंड प्रमाणात महायुतीला समर्थन दिले.
हे समर्थन किती प्रभावी होते याचे अनेक किस्से ऐकावयास मिळत आहेत. महायुतीला मत देण्यास पुरुषांनी आपल्या अर्धांगिनींना विरोध केला. परंतु महिलांनी आपल्या पतींचे मूळीच ऐकले नाही. परिणामी अनेक ठिकाणी कौटुंबिक कलह झाल्याचे ऐकावयास मिळत आहे. आकोट मतदार संघातही असेच झाले. परंतु महिलांचे हे मतदान भारसाखळे यांना नव्हे तर ते महायुतीला झाले आहे. मजेदार म्हणजे या मतांकरिता भारसाखळे यांना जराही सायास करावे लागलेले नाहीत. आपसूकच ही मते त्यांचे झोळीत पडली आहेत. मजेशीर म्हणजे सुरुवातीस घरकुल योजना सोपी, सरळ होती. परंतु हळूहळू या योजनेची नियम बंधने कठोर करण्यात आली. लाडकी बहीण योजनेचीही भविष्यात तिच गत होणार असल्याचा जाणकारांचा होरा आहे.
त्यामुळेच ह्या योजनेचे महिलांवरील गारुड अल्पावधीतच उतरणार असल्याचे भाकीतही जाणकार करीत आहेत. परिणामी सद्यस्थितीत बाळसे मानले जात असलेले हे मतदान वास्तवात महायुतीवर चढलेली सूज असल्याची चर्चा आहे. यासोबतच “बटेंगे तो कटे़गे” या समाजात समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या मंत्राचाही महायुतीला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनचा घोळ तर जुनाच आहे. आता निकालानंतर व्हायरल झालेल्या असंख्य व्हिडिओद्वारे महाराष्ट्रात निर्माण झालेला हा मशिनचा धोका समोर येत आहे. या सोबतच मराठा उमेदवार ललित बहाळे कॅप्टन सुनील डोबाळे, रामप्रभू तराळे हे मराठा उमेदवार निवडून येऊ शकत नसल्याने मत वाया जाईल या भीतीने मराठा मतदारांनी भारसाखळे यांना मते दिली आहेत.
वास्तविक कोणत्याही उमेदवाराला दिलेले मत वाया जात नसते. उलट ज्या विचाराने प्रेरित होऊन मतदार ज्याला मत देतात तो विचार त्या मतदाराचे माध्यमातून प्रबळ होत असतो. त्यामुळे तो उमेदवार निवडून येवो न येवो तो विचार मजबूत करण्याकरिता मत दिले जायला हवे. पसंतीचा उमेदवार निवडून येत नाही म्हणून नाईलाजाने चुकीच्या उमेदवाराला मत दिल्याने मतदाराला भावलेला विचार कमकुवत होतो. केवळ लायक नसूनही एखादा उमेदवार निवडून यावा आणि लायक असूनही एखादा उमेदवार पडावा या उद्देशाने मत देणे हा विचाराचा, लोकशाहीचा आणि लायकीचा खून ठरतो. असाच प्रकार बहाळे, डोंबाळे आणि तराळे यांचे बाबत झाला आहे. त्यामुळेच अनेक मराठा व कुणबी मते भारसाखळे यांचेकडे वळती झाली. परंतु या त्रिकूटाने अवघी दहा हजार मते जरी घेतली असती तर मात्र भारसाखळे पराजित झाले असते.
दुसरीकडे काँग्रेसने कडवी झुंज देऊन समाधानकारक मते मिळविल्याची चर्चा आहे. ॲड. महेश गणगणे यांना सर्वच स्तरातून व जातीसमूहातून मतदान झाल्याचे जनतेच्या ओठावर आहे त्यामुळे कायदेशीररित्या भारसाखळे जिंकले असले तरी भावनिक दृष्ट्या मात्र ॲड. महेश गणगणे यांनी आकोट मतदार संघाचे हृदयात स्थान मिळवले आहे. हा भाग वेगळा कि, प्रचाराचे दरम्यान खर्चा करिता हात ढिला करण्याचा सल्ला देणारे काही नेते प्रचाराचे वाहन वळचणीला उभे करून घरात झोपले किंवा महेशच्या वाहनाने अन्य मतदारसंघात जाऊन काही नेत्यांनी तेथील प्रचार केला तर काहींनी सोबत राहून आपला गेम साधला या काही बाबी महेश गणगणे यांची बाबतीत झाल्या. परंतु त्यावर मात करीत त्यांनी पाऊण लाखापर्यंत मते घेतली.
या गदारोळात वंचित ची मात्र फारच वाताहत झाली. वंचितचा आधारस्तंभ असलेल्या बौद्ध मतदारांमध्येच वंचित उमेदवार दीपक बोडखे यांचे बाबत नाराजी होती. त्यामुळे ही नाराज मते काँग्रेसकडे वळती झाली. दीपक बोडखे यांच्या जातीसमूहातील मते तर परंपरागत भाजपचीच पाठराखण करीत आहेत. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवीत अनेकांनी भारसाखळे यांना पसंती दिली. भरोशाच्या मतांचीच अशी फाटाफूट झाल्याने दीपक बोडखे यांना तृतीय स्थानी थांबावे लागले. तिसरी आघाडी उमेदवार ललित बहाळे मात्र चिंताजनक स्थितीत सापडले. एक लढवय्या, हुशार अभ्यासू दिलदार असा त्यांचा लौकिक आहे. मात्र त्यांनाही त्यांच्या भरोशाच्या लोकांनीच अव्हेरले आणि मतदारसंघाबाहेरील अल्पशिक्षित, वृद्ध आणि आजारी असलेल्या भारसाखळे यांना स्वीकारले हा ललित बहाळे यांचे करिता मोठा हादरा आहे. सोबतच त्यांचे जाती समूहातील तरुण, तडफदार, उंमद्या, अभ्यासू, लढवय्या नेतृत्वाकरिताही हा चिंतेचा विषय ठरला आहे.
याखेरीज अन्य उमेदवार बिचारे का उभे राहिले? हे कळण्यास कोणताच मार्ग नसल्याने काही भुलली भटकलेली मते या लोकांच्या पारड्यात विसावली. अशी स्थिती असताना हे मात्र वास्तव आहे कि, भारसाखळे यांचे विजयापेक्षा काँग्रेस चे महेश गणगणे, वंचित चे दीपक बोडखे, आणि तिसरी आघाडीचे ललित बहाळे या उमेदवारांचीच चर्चा अधिक रंगत आहे.